खेडमध्ये पुन्हा संततधार, जनजीवन विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, खेड

खेड तालुक्यात आज सकाळपासून पावसाने पुन्हा संततधार बरसायला सुरुवात केली असल्याने हळूहळू पूर्वपदावर येऊ पाहणारे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एसटी सेवेचे वेळापत्रक कोलमडले असल्याने ग्रामीण भागातील जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. तुफानी पर्जन्यवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्तेही ठिकठिकाणी खचू लागले असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.

गेले महिनाभर तालुक्यात सतंतधार पर्जन्यवृष्टी होत आहे. सूदैवाने तालुक्यावर फार मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली नसली तरी ग्रामीण भागात पडझडीच्या अनेक घटना घडल्या आहेत. नद्या नाल्यांना आलेल्या पुरात दोघांचा बळी गेला आहे. अनेकांच्या घरांचे, गोठ्यांचे अंशतः नुकसान झाले आहे. गेल्या आठवडाभरात तर पावसाने कहरच केला आहे. मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी वारंवार धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. जगबुडी नदीला येणाऱ्या पुरामुळे मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी पूल तब्बल सात वेळा बंद करावा लागला आहे.

जगबुडी व नारिंगी नदीचे पाणी खेडच्या बाजारपेठेत घुसण्याची शक्यता वारंवार निर्माण होऊ लागली असल्याने व्यापाऱ्यांची झोप उडाली आहे. खाडीपट्टयाला जोडणाऱ्या खेड बहिरवली रस्तावरील सुसरी पूलही वारंवार पाण्याखाली जात असल्याने खाडीपट्टा परिसरातील अनेक गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटू लागला आहे. मुंबई गोवा महामार्ग तर मृत्युचा सापळाच बनला आहे. कशेडी घाटात दोन फूट रस्ता खचला आहे तर भोस्ते व परशुराम घाटात दरडींचा धोका प्रवाशांच्या डोक्यावर आहे. महामार्ग चौपदरीकरणासाठी केलेल्या भरावाची माती पावसामुळे रस्त्यावर येऊन रस्ता निसरडा होत असल्याने दुचाकीसारख्या वाहनांचे अपघात होऊ लागले आहेत. महिनाभर पावसाने तालुक्याचे जनजीवन विस्कळीत करून टाकले असल्याने आता तरी पाठ सोड असे म्हणण्याची वेळ खेडवासींयावर आली आहे.