कोकणात मुसळधार पाऊस, मुंबई गोवा महामार्ग बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात आज दिवसभर पडणाऱ्या संततधार पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर, चिपळूण, राजापूर येथील सखल भागात पुराचे पाणी घुसले आहे. प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिल्याने  – मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने गाठली धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी रात्री आठ  वाजल्यापासून जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. याबरोबरच चिपळूण येथील वाशिष्ठी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली असल्याने हा पूल देखील वाहतूकीसाठी बंद करण्यात आला . महामार्गावर खेड आणि चिपळूण येथे मदत ग्रुपचे सदस्य व पोलीस यांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे.

kokan-river

चिपळूण बाजारपेठेत देखील पाणी घुसले असून सायंकाळी ७:३० वा. चिंचनाका परिसरात जवळपास एक फुट पाणी असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. वाशिष्ठी पूल बंद करण्यात आल्याने लोटे औद्योगिक वसाहतीकडे जाणारी वाहतूक गुहागर बायपास मार्गे फरशी तिठा अशी वळविण्यात आली होती. आजच्या संततधार पावसामुळे खेड दापोली बरोबरच संगमेश्वर, राजापूर येथील सखल भागात पाणी घुसले. राजापूर जवाहर चौक येथे पाणी आल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात शुक्रवारी रात्री देखील पावसाची संततधार राहाणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण आणि खेड येथील पूल सुरक्षेसाठी वाहतूकीस बंद केल्याने चिपळूणसह खेडच्या दोन्ही बाजूंना वाहनाच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. या रखडपट्टीमुळे प्रवासी मात्र कमालीचे त्रस्त झालेले दिसले.