कोकणाला पावसाने झोडपले; अनेक ठिकाणी पुरस दृशस्थिती, वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत

288

रविवारपासुन सरींवर सरीनी पडणार्‍या पावसामुळे राजापूर तालुक्यातून वाहणार्‍या अर्जुना-कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून शहरामध्ये मंगळवारी पुराचे पाणी घुसले. पावसाच्या जोराबरोबर वाढणार्‍या पूराच्या पाण्याने दुपारीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढील भागापर्यंत धडक दिली होती. त्यामुळे शहरासह परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तर, दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यामध्ये व्यापार्‍यांची तारांबळ उडाली होती. गतवर्षीही याच दिवशी शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्याच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या.

रविवारी दुपारनंतर पावसाला सुरूवात झाली होती सोमवारी तर सरींवर सरींनी पाऊस कोसळत होता रात्रीही जोर कायम होता मंगळवारी दिवसभर सरींवर सरींनी पाऊस कोसळत होता. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व परीसरातुन वाहणार्‍या अर्जुना नदीसह कोदवलीकडुन वाहणार्‍या नद्यांना महापुर आला होता. दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती.

दरम्यान पूराच्या पाण्याने जवाहर चौकामध्ये धडक देताना बाजारपेठेला वेढा घातला. त्यामध्ये कोदवली नदीच्या काठावरील शिवाजी पथ मार्गावरील टपर्‍या, दुकाने, कोंढेतड आणि वैशपायंन पूल, बंदधक्का आणि वरचीपेठ परिसर पूराच्या पाण्याखाली गेला आहे. पूराचे पाणी वाढण्याचा पूर्वअंदाज आणि अनुभवामुळे व्यापारी आधीच सतर्क झालेले होते. काहींचा माल तसाच दुकानात होता. त्यांची वाढणार्‍या पूराच्या पाण्यामुळे माल हलविताना चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्र, सतर्कततेमुळे व्यापार्‍यांचे फारसे नुकसान झालेले नाही. या पूरस्थितीमुळे शहरासह परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तालुक्याच्या ग्रामीण भागातील शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्ता पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प झाली होती. तर, अर्जुना-कोदवली नद्यांच्या काठावरील शीळ, गोठणेदोनिवडे, चिखलगाव, उन्हाळे आदी गावांमधील भातशेती पाण्याखाली गेली होती.

जगबुडी आणि नारंगी नदय़ांनी धोक्याची पातळी ओलांडली

सोमवार रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेडमध्ये पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासात खेड तालुक्यात 98.60 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. धुवांधार पावसामुळे खेड शहरालगत वाहणर्‍या जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वहात आहेत. ग्रामीण भागातील नद्या-नालेही दुथडीभरून वाहू लागले असल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने सोमवार रात्रीपासूनच धुवांधार बरसायला सुरवात केली आहे. पावसाची रिपरिप रात्रभर सुरुच राहिली असल्याने नारिंगी आणि जगबुडी या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्या आहेत. जगबुडीचे पाणी मच्छिमार्केट येथून शहराकडे उसळी मारू लागले आहे. तर नारिंगी नदीचे पाणी आजुबाजुच्या शेतांमध्ये घुसल्याने हा संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.

झाड पडून महिलेचा मृत्यू ; एक बैल वाहून गेला; शोध सुरू

सोमवारपासुन कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील प्रिंदावन मानवाडीतील शिल्पा शंकर धुरी वय 45 हिच्या अंगावर  फणसाचे झाड कोसळुन ती गतप्राण झाल्याची घटना घडली आहे तर दोनिवडे येथील संतोष हरिश्चंद्र कुळी यांचा बैल वहाळाला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याची घटना घडली आहे याव्यतिरिक्त किरकोळ पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

राजापूर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असुन त्यामध्ये पडझडीच्या घटना घडल्या आहेत तालुक्यातील प्रिंदावन मधील मानवाडीतील एका महिलेच्या अंगावर फणसाचे झाड कोसळुन ती गतप्राण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान घडली. यातील मयत महिलेचे नाव शिल्पा शंकर धुरी वय 45 असल्याची माहिती महसुल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दोनिवडे येथील संतोश कुळ्ये यांचा एक बैल वहाळाला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याची घटना घडली दरम्यान प्रशासनाकडुन पंचनामे सुरु झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या