मालवण वायरी मार्गावरील वाहतूक ठप्प: वीज वाहिन्या तुटल्या, वीज खांब कोसळले

79

सामना प्रतिनिधी । मालवण

गेले दोन दिवस मालवण तालुक्यात पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. पावसासोबतच वाऱ्यानेही जोर पकडल्याने अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वायरी मार्गावर एक झाड वीज खांब व वीज वाहिन्यांवर कोसळले. यात वीज खांब जमीनदोस्त झाले तर वीज वाहिन्या तुटून गेल्या.

दरम्यान, एक वीज खांब रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकीवर पडून दुचाकीचे नुकसान झाले. वीज खांब व वीज वाहिन्या रस्त्यावर कोसळल्याने वायरी- तारकर्ली देवबाग या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर परिसरातील वीज पुरवठाही खंडित झाला होता.

वायरी बांध- तारकर्ली मार्गावर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक झाड वीज खांबावर कसळले यात परिसरातील ४ ते ५ वीज खांब व वीज वाहिन्या रस्त्यावर कोसळले. स्थानिक ग्रामस्थ व वीज कर्मचारी यांनी शर्तीच्या प्रयत्नाने रस्त्यावरील कोसळलेल्या वीज वाहिन्या व खांब बाजूला करून वायरी तारकर्ली देवबाग मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. यावेळी सरपंच घनश्याम ढोके ग्रा. प सदस्य मनोज झाड, नंदू झाड, मिलिंद झाड,केदार झाड, सुधाकर चिंदरकर, धनंजय रोगे, सुभाष आचरेकर, निशिकांत खोत आदी उपस्थित होते.

सुदैवाने दुचाकी स्वार बचवला
वीज खांबावर झाड कोसळल्याने वायरी हॉटेल किनारा येथील परिसरातील वीज खांब कोसळले. यावेळी दुचाकीस्वार एकनाथ कोळंबकर हा रस्त्यावर दुचाकी लावून रेनकोट घालण्यासाठी हॉटेल मध्ये गेला त्याचवेळी कोसळलेला एक वीज खांबदुचाकीवर पडून नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने दुचाकीस्वार बचावला मात्र दुचाकीचे नुकसान झाले.

आपली प्रतिक्रिया द्या