
सामना प्रतिनिधी । अलिबाग
रायगड जिल्ह्यात चार महिन्यात पडणाऱ्या पावसाचे सरासरी प्रमाण हे तीन हजार मिलिमीटर एवढे दरवर्षी असते. यावेळी दीड महिन्यातच 3313.43 मिलिमीटर पाऊस पडला असून 2018 रोजी आजच्या घडीला 2332 मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यामुळे आजच्या घडीला 981 मिलिमीटरने सरासरी वाढली आहे. त्यामुळे साधारण सप्टेंबर मध्ये पाऊस संपता संपता ही सरासरी चार हजार मिलिमीटरवर जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
रायगड जिल्ह्यात दरवर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडत असतो. त्यामुळे रायगडकरांची पाण्याची समस्या सुटलेली असते. जिल्ह्यात पावसाचे सरासरी प्रमाण हे तीन हजार मिलिमीटर एवढे आहे. यावर्षी पाऊस जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला असला तरी जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती तयार झालेली आहे.
जिल्ह्यात दीड महिन्यात पावसाने सरासरीत उच्चांक गाठला आहे. सहा ऑगस्ट पर्यंतच पावसाने 3313.43 मिलिमीटर सरासरी म्हणजे एकूण 105 टक्के पाऊस जिल्ह्यात पडला आहे. गेल्या वर्षी 6 ऑगस्ट 2018 रोजी हीच पावसाची सरासरी 2332 मिलिमीटर होती. त्यामुळे पाऊस हा गेल्यावर्षीच्या तुलनेत 881मिलिमीटरने वाढला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात पाऊस संपेपर्यंत ही सरासरी चार हजार मिलिमीटर पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील पावसाची स्थिती
जिल्ह्यात 6 ऑगस्ट पर्यंत 53014.91 मिमी पाऊस पडला असून सरासरी 3313.43 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर आज 7 ऑगस्ट रोजी एकूण 1604.70 मिमी पाऊस पडला असून सरासरी 100.29 मिमी पावसाची नोंद झाली आहे. माणगाव मध्ये सर्वाधिक 316 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अलिबाग 14 मिमी, पेण 28 मिमी, मुरुड 161 मिमी, पनवेल 20.40 मिमी, उरण 36 मिमी, कर्जत 65 मिमी, खालापूर 40 मिमी, रोहा 65 मिमी, सुधागड 90 मिमी, तळा 223 मिमी, महाड 210 मिमी, पोलादपूर 144 मिमी, म्हसळा 120 मिमी, श्रीवर्धन 28 मिमी, माथेरान 44.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
























































