खेडमध्ये पावसाचा जोर वाढला, व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवार दुपारपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरु झाला असल्याने शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारिंगी नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली असून नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. आणखी काही तास पाऊस असाच कोसळत राहिला तर खेड शहर पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. गतवर्ष जुलै महिन्यात या दोन्ही नद्यांना आलेल्या पुरामुळे खेदाची बाजारपेठ पाण्याखाली जाऊन व्यापाऱ्यांना मोठा प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला होता या पार्श्वभूमीवर पावसाचा जोर वाढताच व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरवात केली आहे.

गेले काही दिवस तालुक्यात पावसाचा लपंडाव सुरु होता. पेरणी उरकल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय या भीतीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते, मात्र 25 जून पासून पावसाचे पुनरागम झाले आणि शेतकऱ्यांच्या चाऱ्यावर पुन्हा एकदा आनंदाचे हसू दिसू लागले. दमदार पाऊस सुरु होताच शेतकऱ्यांनी अन्य कामे बाजूला ठेवून लावणीच्या कामाला सुरवात केली आजही शेतकरी लावणी उरकण्याची घाई करताना दिसत आहेत.

गेले दोन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होता मात्र आज दुपारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आणि खेड शहरालगत वाहणाऱ्या नारिंगी आणि जगबुडी या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्या. पावसाचा जोर वाढल्यावर या दोन्ही नद्यांचे पाणी खेड शहराला कधी विळखा घालेल याचा नेम नसल्याने पावसाचा जोर वाढताच शहरातील नागरिक आणि व्यापारी यांच्या नजर या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीवर खिळल्या. पुराचे पाणी शहरात घुसले तरी दुकानातील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये यासाठी व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानातील माल सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरवात केली आहे.

पावसाचा जोर वाढू लागला असल्याने नगरपालिका प्रशासन तसेच तालुका प्रशासन यांच्या वतीने नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. शहरात पूर परिस्थिती निर्माण झालीच तर नागरिकाना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी फायबर बोटी तसेच अन्य यंत्रणा तैनात ठेवण्यात आली खेड तालुक्यातील डोंगर किंवा धरणाच्या पायथ्याशी वसलेल्या गावातील ग्रामस्थांनी अधिक सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. काही ठिकाणच्या ग्रामस्थांना खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे.

खेडप्रमाणे चिपळूण तालुक्यालाही पावसाने झोडपून काढले आहे. गावर्षीच्या महापुरावच्या वेदना अद्याप ताज्या असल्याने चिपळूण शहर व परिसरातील नागरिकांची चिंता कमालीची वाढली आहे. चिपळूण शहरातील डीबीजे महाविद्यालयासमोरील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला असल्याने या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. डीबीजे महाविद्यालयासमोर रस्त्यावर पाणी भरू लागताच चिपळूण शहरातील नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. चिपळूण शहरालगत वाहणाऱ्या सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत जसजशी नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत आहे तसतशी चिपळूण शहरातील नागरिकनची भीती वाढताना दिसत आहे.

पावसामुळे महामार्गावरील वाहतूक देखील मंदावली आहे. संततधार पावसात महामार्गावरील परशुराम घाटात वाहने हाकताना चालकांसह प्रवाश्यांच्या पोटातही गोळा येऊ लागला आहे. परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने आधीच हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे त्यातच आता पावसाने जोर धरल्याने परशुराम घाटात दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.