
सामना प्रतिनिधी । मुंबई
शनिवारी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार बरसल्यानंतर मान्सूनपूर्व पावसाने सोसाटय़ाच्या वाऱ्यासह आणि विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली. सायंकाळी अचानक जोरदार बरसलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची पुरती तारांबळ उडाली. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या शुक्रवारपर्यंत म्हणजेच ४८ तासांत महाराष्ट्र आणि गोव्यात दाखल होईल. तर ९ आणि १० जून रोजी मुंबईत जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक ए. के. श्रीवास्तव यांनी वर्तवली आहे.
– कुलाबा येथे ९.० मिमी तर सांताक्रुझमध्ये ४६.४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.
– पंपिंग स्टेशनमुळे पाण्याचा वेगाने निचरा झाला. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला नाही.
– मध्य रेल्वेवर गाडय़ा १५ ते २० मिनिटांनी तर पश्चिम रेल्वेच्या गाडय़ा २० ते २५ मिनिटांनी उशिरा धावत होत्या.
– मुंबई शहरात १३ ठिकाणी, पूर्व उपनगरात ५ तर पश्चिम उपनगरात २१ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या तक्रारी.
– दादरमध्ये झाड कोसळल्याच्या घटनेत तिघे जखमी झाले. लक्ष्मीनारायण बशीराबाद (४५), विकास बैले (४५), हरीश प्रभू (४२) अशी जखमींची नावे आहेत.
हार्बर विस्कळीत
जोरदार सरींमुळे मध्य-हार्बर-पश्चिमरेल्वेची सेवा विस्कळीत झाली. पश्चिम रेल्वेच्या मरीन लाइन्स आणि वांद्रे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरवर जाहिरात फलक कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. हार्बरच्या बेलापूर-सीवूड स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरवर अज्ञातांनी टाकलेल्या केबल वायरमुळे हार्बर रेल्वे विस्कळीत झाली. ही केबल काढून टाकल्यानंतर रात्री उशिरा लोकलसेवा पूर्ववत झाली.
७३ ठिकाणे धोकादायक
पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मान्सूनपूर्व तयारीसाठी अहवाल तयार केला आहे. या अहवालात मुंबईतील सर्व २४ वॉर्डांतील धोकादायक ठिकाणांचा आढावा घेण्यात आला आहे. संपूर्ण मुंबईत ७३ ठिकाणे धोकादायक ठरवण्यात आली आहेत. यामध्ये धोकादायक इमारती, टेकडीवरच्या झोपडय़ा, पाणी तुंबण्यासाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणे, समुद्रकिनारा, नाल्याच्या जवळच्या झोपडय़ा, उच्च दाबाच्या विजेच्या केबल जात असलेला विभाग अशा विविध गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. कुर्ल्यामध्ये अशी सर्वाधिक १३ ठिकाणे आहेत.
वॉर्ड धोकादायक इमारती पाणी भरण्याची दरडी कोसळण्याची
ठिकाणे ठिकाणे
कुर्ला १११ १२ १८
(एल वॉर्ड)
भांडुप १० १२ १५२
(एस वॉर्ड)
घाटकोपर ७७ ११ ३२
(एन वॉर्ड)


























































