सोलापुरात पावसाची दमदार हजेरी; रस्त्यांवर पाणी साचले, नाले ओव्हरफ्लो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज सायंकाळी सोलापूर शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. दोन ते अडीच तास कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले. धोंगडेवस्ती, मंगळवार बाजार येथील नाले ओव्हरफ्लो झाल्याने रस्त्यावर मैलायुक्त पाणी वाहत होते, यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती.

सोलापुरात तब्बल एक आठवडय़ानंतर पावसाने दमदार हजेरी लावली. रविवारी रात्री व सोमवारी सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शाळकरी विद्यार्थ्यांबरोबर बाजारपेठांतील नागरिकांची तारांबळ उडाली. तब्बल दोन ते अडीच तास कोसळलेल्या दमदार पावसामुळे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहन चालविणे जिकिरीचे बनले होते. त्याचप्रमाणे शहरातील नाल्यांची सफाई योग्यरीत्या न झाल्याने नाले तुंबून पाणी रस्त्यांवर वाहत होते. धोंगडेवस्ती परिसरातील लेंडकी नाला ओव्हरफ्लो झाल्याने रस्त्यावर तसेच या परिसरातील नागरीवस्ती आणि अनेकांच्या घरात पाणी शिरले. मंगळवार बाजार परिसरातील गणेश शॉपिंग सेंटरजवळील नालाही भरून वाहू लागल्याने रस्त्यावर लावलेल्या गाडय़ा पाण्यातून वाहत होत्या. या नाल्यातील पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप चालूच होती. या पावसामुळे जिल्हा परिषदेजवळ झाड उन्मळून पडल्याने एका दुकानाचे नुकसान झाले आहे.