
जामखेड परिसरात गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. विशेषतः नदीकाठच्या लोकांना मोठा फटका बसला आहे. पिके पाण्यात गेली आहेत, त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.
शहरातील नागेश्वर मंदिरात जाण्यासाठी धाकटी नदीवर लोखंडी पुल पावसामुळे खचला आहे. उदघाटनाआधीच पुल खचल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी लाइटचे पोल पडलेले आहेत. तसेच दशक्रिया विधीसाठी तयार करण्यात आलेले ओटेही उखडले आहेत. सुमारे तीन कोटी रुपयांचे काम पहिल्याच पावसात खचले व वाहून गेले आहे. सध्या नदीपात्र लहान होत आहेत. अतिक्रमणांमुळे पाणी नदीपात्रा बाहेर येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून केलेले काम पहिल्याच पावसात खचते याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
साकत, जातेगाव, दिघोळ मध्ये ढगफुटी झाली. रात्रभर दिघोळमध्ये पावसाने मोठी दाणादाण उडवून दिली आहे. गावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. विधाते वस्ती येथे मंदिराला पाणी लागले आहे.त्याचबरोबर मांजरा नदीला मोठा पुर आल्याने नदी पात्र सोडून वाहत आहे. दिघोळमध्ये पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. रात्रीपासून येथील नागरिकभीतीच्या सावटाखाली जागे आहेत. संपूर्ण गाव जागे आहे.
दुसरीकडे खैरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस पडला आहे.यामुळे नदीला महापुर आला आहे. पहाटे 4 वाजता बांधखडक येथील पुलपाण्याखाली गेला आहे. पुलावरून पाच फुट पाणी वाहत असल्याचे समजते आहे. खैरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील तुफान पावसामुळे खैरी धरणातमोठ्या प्रमाणात पाणी दाखल होऊ लागले आहे. दरडवाडी येथील पुलाचा कठडा जोरदार पुरामुळे तुटला आहे. धरणाच्या विसर्गात वाढ झाली आहे. नदी काठावरील वंजारवाडी,तरडगाव, सोनेगाव, धनेगाव तालुका जामखेड व चिंचपूर बुद्रुक, पांढरेवाडी, शेळगाव या गावांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती खर्डा सिंचन शाखेचे गणेश काळे यांनी दिली.
सततच्या पावसामुळे शेतकरी चिंचेत आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीन पीक पाण्यात आहे. कसे काढायचे असा प्रश्न आहे. तेव्हा नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत व ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.