
मुंबई दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सायंकाळपासून जोरदार बरसायला सुरुवात केली. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱया नोकरदारांची चांगलीच धावपळ उडाली. सायंकाळपर्यंत 14 ठिकाणी शॉर्टसर्किट तर 5 ठिकाणी भिंती-घरांचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. दरम्यान, हवामान विभागाने पुढील 24 तासांत मुंबईत काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा इशारा आहे.
सायंकाळनंतर पावसाने संततधार सुरू ठेवल्याने दादर टीटी, वडाळा, शीव, अंधेरी, परळ, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, वांद्रे, बोरिवली, मालाड आदी ठिकाणी सखल भागात पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. पालिकेने सखळ भागात पाणी साचलेल्या ठिकाणी पंप लावून पाण्याचा उपसा केल्याने पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली.
अशी झाली पडझड
शहरात 2, पूर्व उपनगरांत 5 व पश्चिम उपनगरांत 7 अशा 14 ठिकाणी झाडे व त्यांच्या फांद्या पडल्या. यात कुणीही जखमी झाले नाही.
शहरात 3, पूर्व उपनगरांत 1 व पश्चिम उपनगरांत 1अशा पाच ठिकाणी घरे व घरांच्या भिंती पडल्या तर पाच ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घटना घडल्या.
पावसाची नोंद (सायंकाळी 6 वाजेपर्यंत)
मुंबई शहर 21 मिमी
पूर्व उपनगर 17 मिमी
पश्चिम उपनगर 25 मिमी



























































