
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील बोअर घाट परिसरात, विशेषतः खोपोली ते खंडाळा दरम्यान पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सकाळपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या कोंडीमुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून अनेक प्रवासी तासन्तास अडकून पडले.
सकाळीच वाहतूक मंदावण्यास सुरुवात झाली. अनेक वाहनचालकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत परिस्थितीची माहिती दिली तसेच संताप व्यक्त केला. सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेल्या वाहनांमुळे वीकएंड ट्रॅफिकचा ताण वाढल्याने ही कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे.
अमृतांजन ब्रिजपासून खोपोली एक्झिटपर्यंत वाहनांची सलग रांग लागल्याचे पाहायला मिळाले. साधारणपणे 10 मिनिटांत पार होणारा हा टप्पा, या दिवशी सुमारे दीड तास लागल्याची माहिती प्रवाशांनी दिली.
दुपारपर्यंतही ही कोंडी कायम होती. एका युजरने सोशल मीडियावर पोस्ट करत, “पुणे लेनवर घाट सेक्शनमध्ये जाम” अशी माहिती दिली. त्यानंतर मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाच्या अधिकृत एक्स हँडलवरून देखील पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टनुसार, खंडाळा घाट व्ह्यू पॉइंट परिसरात पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर अपघातामुळे सुमारे 30 मिनिटांची वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान, एका युजरने उपाय सुचवत, द्रुतगती मार्ग वापरण्यासाठी वेळेचे स्लॉट ठरवावेत, मोबाइल अॅपद्वारे बुकिंग व्यवस्था असावी, टोल नाक्यावर QR कोड दाखवून प्रवेश द्यावा, अशी सूचना केली. शनिवारच्या सुट्टीमुळे वाढलेल्या वाहतुकीचा फटका मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवाशांना बसला असून, अशा प्रसंगी वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.



























































