बोंडअळी व तुडतुडे रोगामुळे बाधित झालेल्या राज्यातील शेतकर्‍यांना मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने । बुलढाणा

खरीप हंगाम २०१७ मध्ये बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिक व तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे धानपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकर्‍यांना मदतीसाठीचा तिसरा हफ्त्याचा पाचशे सदोतीस कोटी अठ्ठावीस लक्ष त्र्याण्णव हजार रुपयाचा निधी देण्याबाबतचे आदेश आज १ नोव्हेंबरला महसूल व वित्त विभागाने काढले असून या निर्णयाचा फायदा नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, नांदेड, नासिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना होणार आहे. सदर रक्कम बाधित शेतकर्‍यांना त्वरीत वितरित करण्यात यावी असेही आदेशात म्हटले आहे.

खरीप हंगाम २०१७ मध्ये बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिक व तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे धानपिकाचे मोठे नुकसान झाले होते. बाधित शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देवू असे शासनाने घोषित केले होते. त्यानुसार आज राज्याच्या महसूल व वन विभागाचे वित्तीय सल्लागार व सहसचिव राजेश्री राऊत यांनी एक आदेश काढून नागपूर जिल्ह्यासाठी १६.०४ कोटी, वर्धा जिल्ह्यासाठी ५१.२६ कोटी, अमरावती ६०.८६ कोटी, अकोला ४५.१७ कोटी, बुलढाणा ४४.७८ कोटी, वाशिम ५.१२ कोटी, परभणी ४६.८५ कोटी, नांदेड ४१.९३ कोटी, नाशिक ६.७७ कोटी, नंदुरबार २९.८९ कोटी, धुळे ६.५३ कोटी, जळगाव १४४.४५ कोटी, अहमदनगर ३७.५७ कोटी या प्रमाणे एकूण पाचशे सदोतीस कोटी अठ्ठावीस लक्ष त्र्याण्णव हजार रुपयाचा निधी संबंधित जिल्ह्याला पाठवला असून त्वरीत वितरीत करण्याचे आदेश दिले आहे.

माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या प्रयत्नाना यश
माजी आमदार विजयराज शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी ३० ऑक्टोबर रोजी पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे जिल्ह्यातील बोंडअळीच्या तिसर्‍या टप्यातील अनुदान दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याची आग्रही मागणी केली होती. या मागणीची पालकमंत्री महोदयानी तात्काळ दखल घेत स्वत: पाठपुरावा केला. याचे फलित आज १ नोहेंबर २०१८ रोजी महसूल व वनविभाग (आपत्ति व्यवस्थापन प्रभाग) खात्याच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील बोंडअळी अनुदानाचा तिसरा टप्प्यास मंजूरी मिळाली असून त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचाही समावेश झाल्याने बोंडअळीच्या तिसर्‍या टप्प्यातील ४४ कोटी रुपये अनुदानास मंजूरी मिळाली असून आता दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मागणीच्या यशस्वितेसाठी पाठपुरावा केल्याबद्दल जिल्ह्यावासियांच्या वतीने पालकमंत्री मंत्री मदन येरावार यांचे विजयराज शिंदे यांनी प्रसिद्धि माध्यमांशी बोलताना जाहिर आभार मानले.