
कलाकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भंभानी यांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयात मंगळवारी मुख्य आरोपी विजय राजभरचा जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली. यावेळी राजभरला विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्याने सर्व आरोपांचे खंडन केले. आपल्याविरोधात सरकारी पक्षाने केलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे त्याने न्यायालयाला सांगितले. त्याचा उर्वरित जबाब शुक्रवारी नोंदवण्यात येणार आहे.
हेमा व भंभानी दुहेरी हत्याकांड प्रकरणात सत्र न्यायाधीश एस. व्ही. भोसले यांच्यापुढे गेल्या आठवडय़ापासून आरोपींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. हेमा व भंभानी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या कलाकार चिंतन उपाध्यायचा जबाब यापूर्वी नोंदवण्यात आला होता. त्याला 80 प्रश्न विचारले गेले होते, त्यावर त्याने काही प्रश्नांवर ‘माहीत नाही’, असे उत्तर दिले, तर काही प्रश्नांना उत्तर देणे टाळले होते. मंगळवारी विजय राजभरला विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना त्यानेही स्वतःविरोधातील सर्व आरोप धुडकावून लावले. त्याला ठाणे कारागृहातून दिंडोशी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. 12 डिसेंबर 2015 रोजी कांदिवलीतील नाल्यात फेकलेल्या बॉक्समध्ये हेमा व भंभानी या दोघांचे मृतदेह सापडले होते. याप्रकरणी चिंतन उपाध्याय व विजय राजभरसह चौघांविरुद्ध खटला सुरू आहे.

























































