लेख – चिनी खासगी सिक्युरिटी कंपन्याचा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन  ([email protected])

असे मानले जाते की, चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज 40-50 देशांमध्ये काम करत आहे. यामध्ये काम करणारे कर्मचारी मुख्यतः पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजे चिनी सैन्याचे रिटायर झालेले सैनिक आणि अधिकारी आहेत. ते मध्य आशिया, आफ्रिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान अशा अनेक देशांमध्ये काम करत आहेत. त्यामुळे अशा भागांमध्ये चिनी प्रभाव वाढत आहे. एका अंदाजाप्रमाणे सध्या 5200 चिनी सिक्युरिटी कंपनी काम करत आहेत.

रायगडच्या हरिहरेश्वरच्या समुद्रात एक संशयास्पद बोट मिळाली. या बोटीत एक काळय़ा रंगाचा बॉक्स आढळून आला. त्यात तीन एके-47 रायफल आणि काही काडतुसे मिळाली. या बोटीवर नेप्च्युन मॅरिटाईम सिक्सुरिटी असे लिहिण्यात आले होते. नेप्च्युनसारख्या सिक्युरिटी कंपनी प्रायव्हेट जहाजांना समुद्रामध्ये सुरक्षा प्रदान करतात. प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनी किंवा भाडोत्री सैनिकांनी अनेक युद्धामध्ये आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये काम केलेले आहे. अमेरिकेच्या प्रायव्हेट मिलिट्री कॉन्ट्रक्टर म्हणजे ब्लॅक वॉटर, रशियाच्या प्रायव्हेट मिलिट्री कॉन्ट्रक्टर्स म्हणजे वॅगनर ग्रुप आणि इतर याविषयी पुष्कळ माहिती उपलब्ध आहे, परंतु चिनी प्रायव्हेट मिलिटरी कंपनीज किंवा चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.

आज अनेक देशांमध्ये चीन बेल्ट आणि रोडच्या नावाखाली रस्ते बांधत आहे, सुविधा निर्माण करत आहे, खाणकाम करत आहे आणि वेगवेगळे कारखाने चालवत आहे. जिथे हजारो, लाखो चिनी नागरिक काम करत आहेत. मात्र कोरोना आणि त्यानंतर केलेल्या चिनी आक्रमक कारवायांमुळे जगातले बहुतेक देश आणि त्यांचे नागरिक चिनीविरोधात गेले आहेत आणि जगामध्ये अनेक ठिकाणी चिनी नागरिकांवरती प्राणघातक हल्ले झाले आहेत आणि होतच राहतील. खास तर अफगाणिस्तानमध्ये आणि पाकिस्तानात. म्हणून या प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीची गरज पडते. कारण चीनचा तिथे असलेल्या पोलीस किंवा सैन्य दलाच्या क्षमतेवर फारसा विश्वास नाही. अर्थात चिनी प्रायव्हेट मिलिटरी कॉन्ट्रक्टर आणि प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीजमध्ये फरक आहे. आतापर्यंत अमेरिका आणि रशियाने आपल्या प्रायव्हेट मिलिट्री कॉन्ट्रक्टरचा वापर आपल्या मित्र राष्ट्रांना मदत करण्याकरिता केला, जसा युव्रेनमध्ये केला जात आहे किंवा अफगाणिस्तानमध्ये केला गेला. मात्र चीनने आपल्या कायद्याप्रमाणे अजून कुठल्याही मित्रराष्ट्रांना लढाईमध्ये प्रायव्हेट मिलिटरी कंपनीची मदत दिलेली नाही. मात्र प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीचा वापर चीन आता कायदेशीररीत्या करू शकतो. 2009 साली अशा प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीच्या उपयोगाकरिता कायदेशीर परवानगी चीनने दिली आणि त्यानंतर त्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.

प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीजना कायदे, नियम लागू नसतात. त्यामुळे ते बिनधास्तपणे काम करू शकतात. काहीवेळा आंतरराष्ट्रीय कायदे इतर देशांमध्ये किंवा समुद्रामध्ये सैन्याचा वापर करायला परवानगी देत नाही. त्यावेळेलासुद्धा या प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनी अत्यंत उपयोगी पडतात. एवढेच नव्हे तर पारंपरिक सैन्याच्या तुलनेमध्ये प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज या कमी खर्चामध्ये काम करतात. कारण त्यांना सर्वकाळ तिथे तैनात करण्याची गरज नसते. काम झाले की त्यांना तिथून बाहेर पाठवता येते. असे अनेक फायदे असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात चीन प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीजचा वापर करत आहे.

असे मानले जाते की, चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज 40-50 देशांमध्ये काम करत आहे. यामध्ये काम करणारे कर्मचारी मुख्यतः पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजे चिनी सैन्याचे रिटायर झालेले सैनिक आणि अधिकारी आहेत. ते मध्य आशिया, आफ्रिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान अशा अनेक देशांमध्ये काम करत आहेत. त्यामुळे अशा भागांमध्ये चिनी प्रभाव वाढत आहे. एका अंदाजाप्रमाणे सध्या 5200 चिनी सिक्युरिटी कंपनी काम करत आहे, ज्यामध्ये 40 लाख निवृत्त सैनिकांना तैनात करण्यात आले आहे.

चीन समुद्रामध्येसुद्धा आपल्या जहाजांना सुरक्षा घेण्याकरिता प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीजचा वापर करत आहे. कारण अनेक भागांमध्ये समुद्रातून हल्ले करून व्यापारी जहाजांचे नुकसान करतात, परंतु दक्षिण चीन समुद्रामध्ये चीन आपल्या मच्छीमारी बोटीच्या बरोबर प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीजचा वापर करून इतर देशांच्या मच्छीमारांवरती हल्ले करून त्यांना घाबरवतो. कारण त्या भागांमध्ये मच्छीमारी करून स्वतःचा फायदा करून घ्यायचा असतो. प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीचा वापर येणाऱया काळामध्ये तैवान आणि इतर आंतरराष्ट्रीय महासागरामध्ये चीन करू शकतो. चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपन्याचे हिंदुस्थानच्या शेजारी राष्ट्रांमध्ये प्रवेश हे नक्कीच हिंदुस्थानकरिता धोकेदायक आहे आणि याविरुद्ध पावले उचलली पाहिजेत.

सर्वप्रथम चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीवरचे संशोधन चालू ठेवावे. ज्या देशांमध्ये या प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज काम करत आहेत त्या देशांना चीनचा विरोध करायला सांगावे. जिथे चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज किंवा चिनी नागरिक आहेत, ते तिथल्या देशांच्या नागरिकांशी गैरवर्तणूक करतात. ते आक्रमकपणे त्यांच्यावर हल्ले करतात. अशा प्रकारचे हल्ले पाकिस्तानी सैन्यावरसुद्धा चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीच्या कर्मचाऱयांनी केलेले आहेत. अफगाणिस्तानमध्येसुद्धा ते अतिशय आक्रमकरीत्या वागत असतात. जिथे चिनी राहतात त्या भागांमध्ये इतर सामान्य नागरिकांना येण्याची परवानगी नसते. उदाहरणार्थ ग्वादर बंदरामध्ये आसपासच्या समुद्रामध्ये स्थानिक मच्छीमारांना मासेमारी करण्याकरिता पूर्णपणे बंदी लावण्यात आली आहे. चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीजचे कटकारस्थान त्या त्या राष्ट्रासमोर वेळोवेळी मांडले पाहिजे. ज्यामुळे त्यांचा अफगाणिस्तान आणि जगातल्या इतर भागांमध्ये होणारा प्रभाव कमी करण्यामध्ये आपल्याला यश मिळेल.