
सामना ऑनलाईन । मालवण
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरचा धुमाकूळ सुरूच आहे. मोठ्या प्रमाणावर मासळीची लूट करताना स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यांचेही नुकसान या ट्रॉलरकडून सुरू आहे. सोमवारी रात्री मालवण समुद्रात गवंडीवाडा येथील मोतेस फर्नांडिस यांची छोटी मासेमारी नौका मासेमारी करत होते. यावेळी त्यांच्या जाळ्यांवरुन हायस्पीड ट्रॉलर गेला. मात्र, ट्रॉलरमध्ये जाळी अडकल्याने मोतेस यांची छोटी बोट ट्रॉलर मागे ओढली गेली. यावेळी प्रसंगावधान राखत बोटीतील खलाशांनी जाळी कापली आणि आपला जीव वाचवला.
हायस्पीड बोटींने केलेल्या नुकसानीची माहिती मोतेस व अन्य मच्छीमारांनी मत्स्य अधिकाऱ्यांना दिली. अशाप्रकारे किनारपट्टीवर परराज्यातील बोटींचा धुमाकूळ सातत्याने सुरू आहे. रात्रीच्यावेळी शेकडोंच्या संख्येने बोटी दाखल होत मासळीची लूट करत आहेत. तरी यावर कारवाई करावी अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी मत्स्य विभागाने मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर पकडला. मात्र तो ट्रॉलर कारवाईपूर्वी पळून गेला. मालवण बंदरात ट्रॉलर आणला तेव्हा काही मच्छीमारांनी त्या ट्रॉलरचे व्हिडीओ शूटिंग केले. त्यात लाखो रुपयांची मासळी त्यात आढळली. तो व्हिडीओ वायरल झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मासळी लूट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.



























































