
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीचे सुरुवातीचे कल पाहिल्यास गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.
गेल्या निवडणुकीत भाजपचे 99 आमदार निवडून आले होते. नंतर इतर पक्ष सोडून भाजपमध्ये आलेल्या आमदारांसह भाजपचे विधानसभेतील एकूण संख्याबळ हे 110 होतं. 8 डिसेंबर रोजी जे सुरुवातीचे कल हाती आले आहेत त्यानुसार भाजपचे 152 उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसचे गेल्या निवडणुकीत 77 आमदार निवडून आले होते. आज सुरु असलेल्या मतमोजणीत काँग्रेसचे 19 उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे. गुजरातच्या निवडणुकीत पहिल्यांदाच आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आपचे 7 उमेदवार आघाडीवर असून हे चित्र बदलण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गुजरातमध्ये काँग्रेसची एवढी बिकट अवस्था यापूर्वी कधीही झाली नव्हती. 1990 साली काँग्रेसच्या सगळ्यात कमी म्हणजे 33 जागा आल्या होत्या. 2022 च्या निवडणुकीत त्याहीपेक्षा कमी जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. 2017 साली काँग्रेसने चांगली कामगिरी करत 77 जागा निवडून आणल्या होत्या. हिमाचल प्रदेशात मात्र काँग्रेसला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात एकूण 68 जागा असून बहुमतासाठी 35 आमदार असणं गरजेचं आहे. काँग्रेस इथे 40 जागांवर आघाडीवर असून भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे. हिमाचल काँग्रेसमधील परिस्थिती पाहाता भाजपने सरचिटणीस विनोद तावडे यांना सिमलाला रवाना केलं आहे. आपले आमदार फुटणार नाही याची काळजी घेण्यासोबतच जर गरज पडली तर सत्तास्थापनेसाठी आमदार कमी पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी त्यांना पाठवण्यात आलं आहे.
























































