हिमाचल प्रदेशमधील ‘त्या’ सहा काँग्रेस आमदारांचा भाजपात प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभा निवडणूकीत काँग्रेसकडे बहुमत असतानाही ऐनवेळी त्यांच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने काँग्रेसचे उमेदवारी अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला होता. त्या सहा आमदारांनी शनिवारी दिल्लीत भाजपात प्रवेश केला. काँग्रेसचे आमदार सुधीर शर्मा, रवि ठाकूर, राजेंद्रसिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो तसेच इंदरदत्त लखनपाल यांनी आज भाजप प्रवेश केला. या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे त्यांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले होते.

दरम्यान त्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर 1 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्या निवडणूकीत जर या जांगांवर काँग्रेस उमेदवार जिंकून आले नाही तर त्यांचे सरकार कोसळू शकते.

अपक्षांची हेराफेरी

आशिष शर्मा (हमीरपूर मतदारसंघ), होशियार सिंग (डेहरा) आणि केएल ठाकूर (नालागढ) या तीन अपक्ष आमदारांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2022 च्या विधानसभा निवडणूकीत या आमदारांनी भाजपकडे तिकीट मागितले होते. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारलेले. त्यानंतर अपक्ष लढून त्यांनी भाजपच्या उमेदवाराला हरवत निवडणूक जिंकली होती. त्यानंतर या अपक्षांनी काँग्रेसच्या सरकारला पाठिंबा दिला होता.

विधानसभेतील संख्याबळ

सध्या हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेसचे 34 आमदार आहेत. तर भाजपचे 25 आमदार आहेत. काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे..

पोटनिवडणूकीवर सत्तांतर अवलंबून

सहा जांगावर होणाऱ्या पोटनिवडणूकीत जर काँग्रेसने त्या सहा जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसचे सरकार तरू शकेल. मात्र जर भाजप या सहाही जागांवर जिंकली तर विधानसभेतील भाजपची संख्या 31 व तीन अपक्षांचा पाठिंबा अशी 34 होईल. मात्र भाजप जरी जिंकली तरी त्या वेळी दोन्ही पक्षांकडे 34-34 असे समान संख्याबळ असणार आहे.