संभाजीनगरात मुस्लीम तरुणाला मारहाण, हिंदू कुटुंबाने वाचवलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

संभाजीनगरमध्ये विनाकारण मुस्लीम तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या तरुणाच्या मदतीला हिंदू कुटुंब पुढे आले आणि त्यांनी त्या तरुणाला जमावापासून वाचवले आहे. दुचाकी रस्त्यामध्ये आडवी लावून मोहम्मद इम्रान पटेल या मुस्लीम तरुणाला अडवून शिवीगाळ करण्यात आली. तसेच त्याला ‘जय श्रीराम’ म्हणायला भाग पाडून काही तरुणांनी त्याला मारहाण केल्याची तक्रार बेगमपुरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पटेलला मारहाण होत असताना त्याने आरडाओरड केल्यावर एक हिंदू कुटुंब त्याच्या मदतीसाठी पुढे आले. मारहाण करणाऱ्या जमावापासून त्यांनी पटेलला सोडवले. ही खळबळजनक घटना संभाजीनगरातील हडको कॉर्नर येथे घडली.

मुजफ्फरनगरमधील मोहम्मद इम्रान पटेल हा एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. नेहमीप्रमाणे गुरूवारी रात्री 12.30 वाजता तो कामाहून घरी परतत होता. हडको कॉर्नर जवळच्या उतारावर रस्त्यामध्ये दुचाकी आडवी उभी करण्यात आल्याने त्याने आपल्या दुचाकीचा वेग कमी केला आणि वाट काढून जात होता. त्यावेळी चारपाच जणांच्या टोळक्याने त्याला अडवले आणि त्याच्या दुचाकीची चाबी काढून घेतली. डोक्यावर गोल टोपी पाहून टोळक्याने त्याला ‘जय श्री राम’ म्हण असे दरडावले. तसेच एकाने शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. या टोळक्याला आपण घाबरलो असल्याने भीतीपोटी आपण तीनवेळा ‘जय श्रीराम’ असे मोठ्याने म्हणालो, असे पटेलने सांगितले. त्यानंतरही त्यांची शिवीगाळ आणि मारहाण सुरूच होती. त्यामुळे आपण आरडाओरड केली. हा आवाज ऐकून जवळच राहणारे एक हिंदू कुटुंब बाहेर आले. त्यांच्यातील गणेश यांनी आपल्याला ओळखले आणि त्यांनी माझी त्या घोळक्यातून आपली सुटका केली असे पटेल याने सांगितले. याबाबतची तक्रार बेगमपुरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.