
हिंदू देवदेवतांचे अश्लील, आक्षेपार्ह छायाचित्र व चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित करून धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेला एक विकृत अखेर पोलिसांच्या जाळय़ात सापडला. ‘एक्स’वर सात खात्यांच्या माध्यमातून देवदेवतांबाबत बीभत्स माहिती प्रसारित करण्यात येत होती. अखेर एकाला मध्य प्रदेशातील इंदूर येथून पोलिसांनी पकडले. तो सीएचा विद्यार्थी आहे.
समाजमाध्यमांवर देवदेवतांचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफित प्रसारित करण्यात येत होती. याविरोधात तक्रार आल्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता मध्य प्रदेशच्या इंदूर येथे राहणारा एक तरुण हे कृत्य करीत असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला पकडले. तो हिंदू देवदेवतांचे अत्यंत अश्लील व आक्षेपार्ह चित्रफित आणि छायाचित्र प्रसारित केल्याचे निष्पन्न झाले आहे. सामाजिक तेढ व धार्मिक भावना दुखावून समाजात वितुष्ट निर्माण करण्याच्या हेतूने त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने त्याला 13 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बनावट खाते खोलून गैरकृत्य
आरोपीच्या मोबाईल डिव्हाईसच्या डिजिटल फॉरेन्सिक विश्लेषणानंतर आणखी सहा खात्यांची ओळख पटली आहे. वेगवेगळय़ा नावाने खोललेल्या सर्व खात्यांवर हिंदू देवतांविषयी अश्लील छायाचित्र व व्हिडीओ प्रसारित केले जात होते. अशा प्रकारे एकूण सात ट्विटर खाती आढळून आली असून अन्य बनावट खात्यांचे मूळ ऑपरेटर शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते.