आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला विरोध, हिंदू महासंघाची न्यायालयात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याची अंमली पदार्थ प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका हिंदू महासंघाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे आणि अॅड. सुबोध पाठक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

मुंबईहून गोव्याला जाणाऱया कॉर्डिलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर एनसीबीने तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली 3 ऑक्टोबर 2021 रोजी कारवाई केली होती. तेव्हा क्रूझवर जाण्यासाठी आलेल्या आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांच्यासह 20 जणांना पकडण्यात आलं होतं. त्यानंतर एनसीबीने आर्यन खानसह सहा जणांना क्लीन चिट दिली आणि आरोपपत्र दाखल करताना त्याच्यासह सहा जणांची नावे त्यातून वगळली. न्यायालयानेही आर्यन खान आणि त्याच्या सहकाऱ्यांना निर्दोष मुक्त केले.

न्यायालयाच्या या निर्णयाला हिंदू महासंघाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यासाठी 13 जुलै 2022 रोजी याचिका दाखल करण्यात आली. या प्रक्रियेत तपास यंत्रणा किती गाफिल राहिल्या, त्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन या सर्व आरोपीना मदत केल्याचे मुद्दे याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत. त्याबाबतची कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याची माहिती दवे आणि ॲड. पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.