
मोफीद खान । अयोध्या
हिंदुत्व आणि राममंदिरासाठी शिवसेनेने नेहमीच आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे आणि संपूर्ण हिंदुस्थान याचा साक्षीदार आहे, असे रोखठोक प्रतिपादन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी येथे केले. 25 वर्षांपूर्वी बाबरी पतनानंतर हिंदुत्ववादी सरकारे येऊनही राममंदिराची निर्मिती झालेली नाही. 2014 मध्येही हिंदुत्ववादी पक्षांना प्रचंड बहुमत मिळूनही मंदिराबाबत काहीच हालचाल नाही. आता 2019 च्या निवडणुकीत राममंदिर हा प्रचाराचा मुद्दा बनू नये आणि त्यापूर्वीच मंदिरनिर्मितीला सुरुवात व्हावी म्हणूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘पहले मंदिर फिर सरकार’ हा नारा दिला असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी लक्ष्मण किला परिसरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजच्या कार्यक्रमाबाबत माहिती देतानाच पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. आज, शनिवारी दुपारी दोन वाजता उद्धव ठाकरे यांचे अयोध्येत आगमन होईल आणि तेथून ते लक्ष्मण किला येथे आयोजित संतांच्या सन्मान आणि आशीर्वादोत्सव कार्यक्रमात सहभागी होतील असे त्यांनी सांगितले.
श्री लक्ष्मण किलाधीश महंत मैथिलीशरण महाराज यांच्या उपस्थितीत आणि पंडित अमरनाथ मिश्र यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे शरयू नदीची आरती करतील. 25 नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता ते रामजन्मभूमीवरील रामलल्लाचे दर्शन घेतील, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली. केंद्र सरकारने राममंदिर निर्मितीसाठी अध्यादेश काढावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केली होती असे सांगतानाच राऊत म्हणाले की, रिझर्व्ह बँकेला न विचारता नोटाबंदी केली जाते तर राममंदिर निर्मितीसाठी कायदा बनवायला काय हरकत आहे? मंदिर मुद्दा हा न्यायालयात किंवा शक्तिप्रदर्शनाने सुटणार नसून यासंदर्भात विधेयक आणले पाहिजे असे ते म्हणाले. या विधेयकाला सुमारे शिवसेनेसह 400 खासदार पाठिंबा देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना नेते व महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, खासदार राजन विचारे, आमदार ऍड. अनिल परब, सुनील प्रभू, अजय चौधरी आदी उपस्थित होते.
शिवसेनेसाठी ही अभिमानाची गोष्ट
उद्धव ठाकरे हे तीर्थयात्री म्हणून अयोध्येत येत आहेत. त्यांच्या अयोध्येत येण्याने मंदिर निर्माणाच्या प्रक्रियेला गती मिळत असेल आणि शिवसेना त्याचा एक हिस्सा बनत असेल तर ती शिवसेनेसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे खासदार राऊत यावेळी म्हणाले. अयोध्येच्या भूमीशी शिवसेनेचे भावनिक नाते आहे. अनेक वर्षांपासूनचे हे नाते आणखी मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्येत येत आहेत, असे ते म्हणाले.
शिवसैनिक, साधुसंतांच्या बलिदानामुळेच मंदिर आंदोलनाला गती
राममंदिराचे निर्माण फक्त राजकारण आणि नेत्यांमुळे होणार नाही, तर अयोध्या आंदोलनात शहीद झालेले यात्रेकरू, शिवसैनिक आणि साधुसंतांच्या बलिदानामुळेच मंदिर आंदोलनाला गती मिळाली आहे, असे खासदार राऊत यांनी यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
योगी आदित्यनाथ यांचा आशीर्वाद घेऊनच कार्यक्रम करतोय
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी झालेल्या भेटीबाबत पत्रकारांनी खासदार राऊत यांना यावेळी विचारले. त्यावर ते म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर ही पहिलीच भेट नव्हती. ते खासदार होते आणि आमचे सहकारी होते, तसेच ते केवळ मुख्यमंत्री नाहीत तर गोरक्षनाथ पीठाचे महंतही आहेत असे खासदार राऊत म्हणाले. त्यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केल्याचेही ते म्हणाले. शिवसेनेने अयोध्येत जाहीर सभेसाठी परवानगी मागितलीच नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.




























































