
सामना प्रतिनिधी । हिंगोली
मारवाडी समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निषेधार्थ हिंगोली शहरात शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला. शिंदे यांनी समाजाची जाहिर माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नागपुर येथे मारवाडी फाऊंडेशनच्या वतीने दिल्या जाणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी मारवाडी एकेकाळी गरीबांची पिळवणुक करणारा समाज होता, असे भावना दुखविणारे वक्तव्य केले. समाजाबद्दल तेढ निर्माण करणार्या वक्तव्याच्या निषेधार्थ मारवाडी समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढून निषेध नोंदवला.
या मोर्चात आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, माजी आमदार गजानन घुगे, रामेश्वर शिंदे, पंकज अग्रवाल, पवन उपाध्ये, अॅड.आर.एन.अग्रवाल, शामसुंदर मुंदडा, रमेशचंद्र बगडीया, नंदकिशोर तोष्णीवाल, सुरेश धूत, मिलींद यंबल, मनोज शर्मा आदीसह सकल माहेश्वरी समाज सहभागी झाले होते.


























































