
हिंजवडी आयटी पार्क परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरक्षारक्षकानेच माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार केला आहे. सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या 9 वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला हिंजवडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार बुधवारी घडला आहे. या घटनेमुळे आयटी नगरीत पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
विजय मधुकर चव्हाण (24) असे अटक केलेल्या आरोपी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दोन लहान मुली सोसायटीच्या प्ले-एरियामध्ये खेळत होत्या. यावेळी तिथे तैनात असलेला आरोपीने दोन्ही मुलींना गोड बोलून आपल्याकडे बोलावून घेतले. मुली जवळ येताच त्याने त्यातील एका चिमुरडीशी लज्जास्पद आणि अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. मुलगी प्रचंड घाबरली, मात्र तिने प्रसंगावधान राखत तिथून पळ काढला आणि थेट घर गाठून पालकांना घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. आपल्या पोटच्या गोळ्यासोबत झालेला प्रकार ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी क्षणभरही विलंब न करता हिंजवडी पोलीस स्टेशन गाठले.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. तक्रार प्राप्त होताच मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी सोसायटीत छापा टाकून आरोपी विजय चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्यावर ‘पोक्सो’ अंतर्गत कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

























































