
हिंजवडी आयटी पार्कमध्ये भरधाव सिमेंट मिक्सर वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने औद्योगिक परिसरातील अवजड वाहनांमुळे निर्माण होणारी अपघातांची गंभीर समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. भरधाव ट्रक, डम्पर, मिक्सर आणि कंटेनरमुळे दुचाकीसह इतर वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना कायमच जीव मुठीत घेऊन रस्त्याने ये-जा करावी लागत आहे.
चालू वर्षातील १ जानेवारी ते १० ऑक्टोबर या कालावधीत अवजड वाहनांमुळे झालेल्या ११७ अपघातात तब्बल ११९ जणांचे बळी गेले आहेत. तर, जखमी झालेल्या ३५ जणांवर कायमचे जायबंदी होण्याची वेळ आली आहे. सर्वाधिक ३७ बळी महाळुंगे एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत गेले आहेत.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना बंदी असतानाही शुक्रवारी (दि. १०) सिमेंट मिक्सर या अवजड वाहनाने भारती मिश्रा (वय ३०, रा. थेरगाव) या दुचाकीचालक महिलेचा बळी घेतला. पिंपरी-चिंचवड शहराला उद्योगनगरी अशी ओळख आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी, भोसरी, चिखली, तळवडे, मरकळ, चाकण, महाळुंगे हा एमआयडीसीचा भाग आहे. या औद्योगिक परिसरात टाटा, बजाज, महिंद्रा, मर्सिडीझ, फॉक्स वॅगें न यासारख्या विविध वाहनांचे उत्पादन होते. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहराला जोडणारा रस्ता पिंपरी चिंचवडहून जातो. यामुळे शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होताना दिसते.
शहरात अवजड वाहनांना सकाळी आठ ते बारा आणि सायंकाळी चार ते नऊ या वेळेत प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. असे असतानाही या बंदी आदेशाचे अवजड वाहनचालकांकडून उल्लंघन केले जात आहे. विशेषतः औद्योगिक पट्ट्यात येणाऱ्या महाळुंगे एमआयडीसी, चाकण, हिंजवडी, भोसरी एमआयडीसी, हिंजवडी, बावधन अशा भागांमध्ये मोठे ट्रेलर, ट्रक व इतर अवजड वाहनांची वाहतूक होते. याशिवाय शहरात ठिकठिकाणी मोठ-मोठे बांधकाम प्रकल्प सुरू असल्याने सिमेंट मिक्सर, डंपर यासारख्या अवजड वाहनांचीही सतत वाहतूक सुरू असते. मात्र, ही वाहने दिवसा गर्दीच्या वेळी शहरात येतात आणि सर्वसामान्य दुचाकीचालकांचा काळ ठरतात. अवजड वाहनांचे निम्म्याहून जास्त अपघात महाळुंगे एमआयडीसी, चाकण, भोसरी एमआयडीसी आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ७२ अपघातात ७५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
रस्त्याकडेची उभी वाहनेही ठरतात काळ
बहुतांशी अवजड वाहने ही लांब पल्ल्याची अन् रात्रीची वाहतूक करतात. हे वाहनचालक अनेकदा आपली अवजड वाहने रस्त्याच्या कडेला लावून आराम करतात. अनेक बाहनांना नियमानुसार बंधनकारक असलेले रेडियम लावलेले नसते. यामुळे रात्रीच्या वेळी इतर वाहनचालकांना ही वाहने दिसत नाहीत. परिणामी रात्रीच्या वेळी वेगात जात असलेली इतर वाहने या अवजड वाहनांना धडकतात आणि नाहक बळी ठरतात. पिंपरी-चिंचवडमध्ये अशा अपघातांची अनेक उदाहरणे आहेत. तर काहीवेळा हे अपघात इतके भीषण असतात की अवजड वाहनात अडकलेले वाहन क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढावे लागते. यामुळे अशा वाहनांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
उपाययोजना राबवण्याची गरज
अवजड वाहनांना ठरावीक वेळेत (वर्दळ असताना) शहरात प्रवेश बंदी करावी.
औद्योगिक वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ते तयार करावेत.
रस्ते सुरक्षा झोनमध्ये पोलिसांची अधिक गस्त वाढवावी.
चालकांची वैद्यकीय व मानसशास्त्रीय चाचणी नियमित घ्यावी.
जागोजागी सीसीटीव्ही व वाहन ट्रॅकिंग सिस्टीम कार्यान्वित करावी
नऊ महिन्यांत गेलेले बळी
सांगवी ११०, दापोडी ४४२, चिंचवड ३३०, एमआयडीसी भोसरी – १०१०५, रावेत ८६२, देहूरोड – ५६३, ११०, महाळुंगे एमआयडीसी-३७३७८, हिंजवडी – १०१११, , काळेवाडी – १११, तळेगाव दाभाडे -४४०, चिखली-चाकण – १५१७९, वाकड एमआयडीसी- ५५४, बावधन – ९९०, एकूण ११७११९३५