
1980 साली अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली होती. पण आता भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी आडवाणी आणि जोशी मतदान करू शकणार नाही. ज्यांनी पक्षाची स्थापना केली त्यांनाच पक्षाचा अध्यक्षाला मतदान करण्यापासून वंचित ठेवले जाणार आहे.
भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात 20 जानेवारी 2026 हा दिवस महत्त्वाचा ठरणार असून या दिवशी पक्षाच्या नेतृत्वात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. 45 वर्षीय नितिन नवीन यांची भाजपच्या पुढील राष्ट्रीय अध्यक्षपदी निर्विरोध निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. डिसेंबर 2025 पासून कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणारे नितिन नवीन आता पूर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत. बिहारमधील बांकीपूर मतदारसंघाचे आमदार असलेले नितिन नवीन हे दिवंगत भाजप नेते आणि माजी मंत्री नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे पुत्र असून, संघटनात्मक पार्श्वभूमी आणि आरएसएसशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे ते पक्षात प्रभावी नेता म्हणून ओळखले जातात. छत्तीसगडसारख्या राज्यात भाजपला निवडणुकीत मिळालेल्या यशात त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचेही सांगितले जाते. 19 जानेवारी रोजी नितिन नवीन यांचे नामांकन दाखल होणार असून 20 जानेवारीला त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. त्यांच्या नामांकनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रस्तावक असतील.
मात्र या अध्यक्षीय निवडणुकीत एक महत्त्वाची बाब म्हणजे भाजपचे संस्थापक सदस्य आणि ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे पहिल्यांदाच मतदान करू शकणार नाहीत. 1980 मध्ये भाजपची स्थापना झाल्यानंतर प्रथमच या दोन्ही दिग्गजांची नावे अध्यक्षीय निवडणुकीच्या मतदार यादीत नाहीत. यामागे कोणतीही राजकीय नाराजी नसून, पक्षाच्या संविधानाशी संबंधित तांत्रिक कारणे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भाजपच्या नियमानुसार राष्ट्रीय परिषद सदस्य होण्यासाठी संबंधित राज्यात संघटनात्मक निवडणुका पूर्ण होणे आवश्यक असते. सध्या आडवाणी आणि जोशी हे दिल्लीमधून राष्ट्रीय परिषद सदस्य आहेत, मात्र दिल्ली प्रदेश भाजपमध्ये अद्याप मंडल, जिल्हा आणि प्रदेश पातळीवरील संघटनात्मक निवडणुका पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे दिल्लीमधून राष्ट्रीय परिषद सदस्यांची अंतिम निवड होऊ शकलेली नाही आणि परिणामी या दोघांची नावे मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत. याआधी लाल कृष्ण आडवाणी गुजरातमधील गांधीनगरमधून, तर मुरली मनोहर जोशी उत्तर प्रदेशातील कानपूरमधून राष्ट्रीय परिषद सदस्य होते. सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर ते दिल्लीमधून परिषद सदस्य झाले होते.
भाजपचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी के. लक्ष्मण यांनी अध्यक्षीय निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून 19 जानेवारी रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत नामांकन प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी नामांकनपत्रांची छाननी आणि माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून 20 जानेवारीला गरज भासल्यास मतदान, अन्यथा बिनविरोध निवडीची घोषणा केली जाईल. सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची जागा घेणाऱ्या नितिन नवीन यांच्यासमोर 2029 च्या लोकसभा निवडणुकांसाठी संघटना अधिक मजबूत करण्याचे आणि पश्चिम बंगाल, आसाम, केरळ यांसारख्या राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांत पक्षाची कामगिरी सुधारण्याचे मोठे आव्हान असणार आहे. युवा नेतृत्वाच्या माध्यमातून भाजप पुढील पिढीचे नेतृत्व घडवण्यावर भर देत असल्याचे या निवडीवरून स्पष्ट होत आहे.




























































