पल्लवांचे वैभव ‘महाबलिपुरम’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशुतोष बापट

महाबलिपुरम हे चेन्नईपासून दक्षिणेला 56 कि. मी. वर असलेले ठिकाण. मामल्लपुरम असेही याचे नाव होते. इथल्या स्थापत्यसमूहाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. इ.स.च्या 7-8व्या शतकात पल्लव राजवटीमध्ये इथले स्थापत्य निर्माण झाले. पल्लवांनी एकाच दगडात कोरून काढलेली रथमंदिरे, विविध लेणी तसेच मोठय़ा शिलाखंडावर कोरलेले गंगावतरणाचे कथनशिल्प हे इथले खास वैशिष्टय़.

दक्षिण हिंदुस्थानातील आजच्या तामिळनाडू राज्यात साधारणतः इ.स.च्या सहाव्या शतकात बलशाली असलेला राजवंश म्हणजे पल्लव राजवंश. तामीळनाडूमधील तोडमंगलम या प्रदेशावर राज्य करणारा हा राजवंश. कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती. मणिमेकलाई या महाकाव्याच्या आधारे पल्लव राजवंशाचा मूळपुरुष हा चोल राजपुत्र व नाग राजकन्या यांचा पुत्र होता, आणि त्या नाग राजकन्येची जन्मभूमी मणिपल्लम ही होती. त्यामुळे त्याच्या कुळाला पल्लव हे नाव प्राप्त झाले असे काही अभ्यासकांचे मत आहे. त्यांच्या राजवटीवर उत्तर हिंदुस्थानी सांस्कृतिक परंपरांची छाप स्पष्ट दिसून येते. त्यांनी धर्ममहाराज, अश्वमेधयाजीन इत्यादी पदव्या घेतल्या होत्या. त्यांचे आरंभीचे ताम्रपट प्राकृत भाषेत असून नंतरचे ताम्रपट हे संस्कृत भाषेत आहेत. सिंहविष्णू, महेंद्रवर्मा, नरसिंहवर्मा असे बलशाली राजे या घराण्यात होऊन गेले.

यातल्या नरसिंहवर्माने चोळ, चालुक्य आणि कलभ्र या राजांचा पराभव केला होता. त्याने ‘महामल्ल’ ही पदवी घेतली होती. त्याच्याच प्रेरणेने अखंड खडकात खोदून काढलेली रथमंदिरे महाबलिपुरम इथे आजही उभी आहेत. महाबलिपुरम हे चेन्नईपासून दक्षिणेला 56 कि. मी. वर असलेले ठिकाण. मामल्लपुरम असेही याचे नाव होते. इथल्या स्थापत्यसमूहाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. इ.स. च्या 7-8 व्या शतकात पल्लव राजवटीमध्ये इथले स्थापत्य निर्माण झाले. पल्लवांनी एकाच दगडात कोरून काढलेली रथमंदिरे, विविध लेणी तसेच मोठया शिलाखंडावर कोरलेले गंगावतरणाचे कथनशिल्प हे इथले खास वैशिष्टय आणि याचसोबत समुद्रकिनाऱ्यावर असलेले इथले तटमंदिर हीसुद्धा पल्लवकालीन कलाकृती इथे पाहायला मिळते. छोटय़ा टेकडीच्या उतारावर वर्षानुवर्षे अर्धवट कललेला भलामोठा दगडही इथेच पाहायला मिळतो. खडकात खोदून काढलेल्या स्थापत्याबरोबरच दगडी बांधीव मंदिरेसुद्धा इथे दिसतात. पल्लव राजवटीच्या काळात बहराला आलेली स्थापत्यकला याद्वारे आपल्यासमोर उभी राहते. पल्लवांचा राजा नरसिंहवर्मन पहिला याच्याकडे या एका दगडातून कोरून काढलेल्या रथमंदिरांच्या निर्मितीचे श्रेय जाते. हिंदुस्थानात अशा प्रकारची ही पहिलीच कलाकृती होय. इथे दगडातून कोरून काढलेली पाच मंदिरे आहेत. ती जणू काही रथ आहेत असे समजून त्यांना रथमंदिरे असे नाव मिळाले आहे. संख्येने पाच असल्यामुळे त्यांना पांडवांची नावे दिली आहेत. धर्मराज रथ, भीम रथ, अर्जुन रथ, द्रौपदी रथ आणि नकुल-सहदेव रथ अशी ही पाच नावे. लाकडात तयार केलेल्या या प्रतिकृतींवरून पुढे दगडात या रथांची निर्मिती झाल्याचे सांगतात. नरसिंहवर्माच्या काळात सुरू झालेली ही रथनिर्मिती पुढे त्याच्या मृत्यूनंतर अर्धवट राहिल्याचे अभ्यासक सांगतात. खास द्राविड शैलीमध्ये निर्माण केलेले हे स्थापत्य अत्यंत सुंदर आहे. चौरस, आयताकृती अशा निरनिराळ्या विधानांवर निर्मिलेले हे स्थापत्य म्हणजे स्थापत्यशैलीतील विविधतेचा एकाच ठिकाणी दिसणारा आविष्कार समजला जातो. हरिहर, ब्रह्मा, स्कंद, अर्धनारीश्वर अशा मूर्तींचे अंकन तसेच काही शिलालेख धर्मराज रथावर फार सुबकपणे केलेले दिसतात. यातल्या नकुल-सहदेव रथाच्या छताचे स्वरूप इतरांपेक्षा काहीसे निराळे आहे.

महाबलिपुरम इथले दुसरे ठिकाण म्हणजे गंगावतरण शिल्प. एका मोठय़ा प्रस्तरखंडावर अत्यंत विस्तृत आणि देखणे असे हे शिल्प कोरलेले आहे. गंगेचे पृथ्वीवर झालेले आगमन, तिचा प्रवाह, त्या प्रवाहात न्हाऊन निघणारे अनेक प्राणी, जलचर, त्यात खेळणारे हत्ती, त्यांची पिले, बाजूला तपश्चर्या करणारे साधक, गंधर्व, अप्सरा, नाग असा एक अतिभव्य शिल्पपट आपल्यासमोर उभा राहतो. या प्रस्तरखंडाला मध्यभागी मोठी खाच असून पावसाळ्यात तिथून पाण्याचा मोठा प्रवाह वाहत असतो. स्वर्गीची गंगा खरोखरच अवतरली आहे असा जणू भास व्हावा अशी ही निर्मिती आहे. पल्लव सम्राट नरसिंहवर्मा याने चालुक्य सम्राट पुलकेशी दुसरा याचा पराभव केला. या विजयाप्रीत्यर्थ या शिल्पाकृतीची निर्मिती झाल्याचे सांगतात. या शिल्पातला एका पायावर उभा राहून तपश्चर्या करणारा साधक फारच रेखीव आहे. हा साधक म्हणजे भगीरथ आहे असे समजले जाते. तर हा साधक पाशुपत अस्त्राच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करणारा अर्जुन आहे असे समजून अनेक जण या शिल्पाला ‘अर्जुनाची तपश्चर्या’ असेही म्हणतात. अतिशय भव्य-दिव्य, देखणा आणि प्रशस्त असा हा शिल्पपट म्हणजे महाबलिपुरमचे वैभव म्हणावे लागेल. यालाच लागून दोन लेणी असून एकात पृथ्वीला पाताळातून बाहेर आणणाऱया वराहाचे शिल्प आहे तर दुसऱया लेणीत श्रीकृष्णाने उचलून धरलेला गोवर्धन पर्वत शिल्पांकित केलेला आहे. लाईफसाईज आकारातील ही शिल्पे आपल्याला थक्क करून सोडतात. गोवर्धन पर्वताबरोबरच गाईचे दूध काढणारा माणूस, डोक्यावर वस्तू घेऊन जाणारे गावकरी असे ग्रामीण जीवनाचे जिवंत चित्र शिल्पाद्वारे उभे केलेले दिसते. जवळच असलेल्या टेकडीवर असलेल्या लेणीत महिषासुरमर्दिनीची आगळीवेगळी मूर्ती कोरलेली आहे. अगदी असेच शिल्प वेरूळ इथल्या लेणीत पाहायला मिळते.

बंगालच्या उपसागरावर बांधलेले तटमंदिर हे पल्लव मंदिर स्थापत्याचे सुंदर उदाहरण म्हणावे लागेल. पल्लवांनी लेणी, एकाश्म मंदिरे यासोबतच दगडात बांधलेले हे तटमंदिर देखणे आहे. समुद्राच्या पार्श्वभूमीवर हे उठून दिसते. इ. स. च्या 8 व्या शतकात बांधलेले हे मंदिर एकेकाळी अतिशय गजबजलेल्या व्यापारी बंदरावर बांधलेले आहे. मंदिरावर विविध शिल्पे पाहायला मिळतात. त्यातले शिव-पार्वती आणि स्कंद यांचे ‘सोमास्कंद शिल्प’ अवश्य पाहावे असे आहे. महाबलिपुरम इथल्या या सगळ्या वास्तूंसाठी पुरातत्व खात्याचे एकच तिकीट असते. ऐन सूर्यप्रकाशात उजळून निघणारी ही वास्तुशिल्पे वेळ काढून पाहावीत. मुबलक फोटो काढावेत आणि हजारो वर्षांपूर्वीपासून आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला हा वारसा डोळे भरून पाहावा. चेन्नईच्या जवळ असलेले हे ठिकाण आज आपला वारसा मोठय़ा अभिमानाने मिरवताना दिसते. एकाश्म मंदिरांची सुरुवात जिथे झाली ते हे ठिकाण. पल्लवांचे वैभव आपल्याला इथल्या प्रत्येक वास्तूमधून पदोपदी जाणवते.

[email protected]