
तासगावात भित्तीचित्रे असणारी ऐतिहासिक बारव सापडली आहे. त्यावर दोन शिलालेखही आहेत. भित्तीचित्रे असणारी ही राज्यातील एकमेव विहीर आहे. यामधील संस्कृत शिलालेखानुसार विहिरीचे बांधकाम शके 1750 म्हणजेच 1828 च्या सुमारास झाल्याचे स्पष्ट होते. तसेच 1949 ते 1960 या दशकात विहिरीचा जीर्णोद्धार झाल्याचे स्पष्ट होते.
विहीर बारव स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. ती अनेक वर्षे वापराविना होती. विहिरीतील कचरा आणि गाळ काढल्यानंतर या विहिरीचे मूळ रुप उजेडात येतेय. चावीच्या किंवा शिवलिंगाच्या आकाराची विहीर आहे. आत उतरण्यासाठी मुख्य पायऱ्यांशिवाय दोन्ही बाजूला अर्धगोलाकार पायऱ्या आहेत. विहिरीला कमान असून त्यावर गच्ची आहे. कमानीच्या बाजूला खोलीसदृश बांधकाम आहे. यामध्ये एक गाभारा असून तिथे शिवलिंग असल्याचे सांगितले जाते. हे सर्व बांधकाम चुन्यामध्ये केले असून कमानींवर, गच्चीवर आणि खोलीसदृश भागात चुन्यामध्ये नक्षीकाम केलेले आहे.



























































