संभाजीनगरात घडला इतिहास! एकाचवेळी 250 ईव्हीची नोंदणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रदूषण निर्मूलनाचा एक भाग म्हणून संभाजीनगरच्या उद्योजकांनी मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या माध्यमातून मिशन ग्रीन मोबिलिटी हे अभियान हाती घेतल्यानंतर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संभाजीनगरकरांनी गेल्या काही महिन्यांत तब्बल 250 चारचाकी इलेक्ट्रिक वाहने बुक केली आहेत. त्यापैकी 101 ईव्ही वाहनांचे वितरण  सोमवारी करण्यात आले.

संभाजीनगर शहर हे राज्यातील आघाडीचे औद्योगिक उत्पादन आणि ऑटोमोबाईल हब म्हणून नावारूपास आलेले असून, या अभियानामुळे आता ते प्रदूषणमुक्त, हरित व स्वच्छ संभाजीनगर शहर परिसर होऊन ईव्ही हबही बनल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी केले. त्यांनी यावेळी माहिती दिली की, आतापर्यंत ‘टाटा मोटर्स ने 20,000 ईव्ही कार विकल्या असून, त्यामुळे तब्बल 10 हजार मेट्रिक टन कार्बन एमिशन कमी होण्यास मदत झाली, हे म्हणजे दीड लाख झाडे लावण्यासारखे आहे असेही ते म्हणाले.

मिशन ग्रीन मोबिलिटीबद्दल माहिती सांगताना उल्हास गवळी यांनी म्हटले की, काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषणाच्या कारणावरून संभाजीनगरच्या उद्योग क्षेत्रात काही वरून) निर्बंध लावले होते. यावर तोडगा काढत असताना प्रदूषणमुक्त, हरित आणि स्वच्छ संभाजीनगर व औद्योगिक परिसर करण्यासाठी मिशन ग्रीन मोबिलिटी या मिशनला सुरुवात करण्यात आली. उद्योजक आणि शहरवासीयांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे अल्पावधीत संभाजीनगर या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. पहिल्या टप्प्यात कार, नंतर इलेक्ट्रिक तीनचाकी, दुचाकी व बसेस रस्त्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.

मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले, स्मार्ट सिटीच्या वतीने ईव्ही पॉलिसीची अंमलबजावणी करण्यात येत असून 60 नवीन ईव्ही स्मार्ट शहर बसेस दाखल केल्या जाणार आहेत. ईव्ही कारसाठी शहरात 200 हून अधिक चार्जिंग स्टेशन निर्माण करण्यात येत आहेत. हॉटेल रामा येथे झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजलक्ष्मी लोढा यांनी केले तर आभार सतीश लोढा यांनी मानले. कार्यक्रमास राम भोगले, मानसिंग पवार, शिवप्रसाद जाजू, प्रसाद कोकीळ, आशिष गर्दे, ऋषी बागला, मुनीष शर्मा, गिरधर संगेरीया, डॉ. उल्हास गवळी, प्रशांत देशपांडे, सचिन मुळे, अभय हंचनाळ व मनीष धूत यांची प्रमुख उपस्थिती होती.