अॅनिमलमधील ‘अर्जन वैली’ गाण्याची धूम, शिखांच्या इतिहासाशी संबंध असलेल्या या गाण्याविषयी जाणून घ्या..

सध्या बॉक्स ऑफिसवर अॅनिमल या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. एकिकडे चित्रपटातील विविध दृश्यांवर सडकून टीका होत असताना दुसरीकडे चित्रपटातील गाणी लोकप्रिय होत आहेत. त्यातील अर्जन वैली हे गाणं लोकांच्या विशेष पसंतीला उतरत आहे. वास्तविक चित्रपटात एका अतर्क्य आणि रक्तरंजित प्रसंगावर चित्रित झालेलं हे गाणं पंजाबी लोकगीतांमध्ये आपली विशेष जागा राखून आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की हे गाणं पंजाबमधील एका वीराला समर्पित आहे.

या वीराचं नाव होतं अर्जन वैली. अर्जन वैली म्हणजे अर्जन सिंह नलवा. महाराजा रणजीत सिंह यांच्या सैन्यातील कमांडर हरि सिंह नलवा यांचे पुत्र म्हणजे अर्जन सिंह नलवा. त्यांना वैली ही उपाधी त्यांच्या निडरपणामुळे मिळाली. अर्जन वैली या गाण्यातही त्यांच्या शौर्याचं वर्णन केलेलं आढळतं.

अर्जन सिंह नलवा यांचं अतिशय आवडतं शस्त्र होतं कुऱ्हाड. कुऱ्हाडीला पंजाबी भाषेत गंडासा किंवा गंडासी म्हणतात. अर्जन सिंह यांनी पिता हरि सिंह यांच्या निधनानंतर सैन्यातील त्यांची जागा घेतली आणि मुघलांविरोधात लढाया लढल्या. हातात कुऱ्हाड घेऊन अतिशय धाडसाने लढलेल्या अर्जन सिंह यांच्या शौर्याचं वर्णन या गाण्यात करण्यात आलं आहे.