
हिंदुस्थान आणि अमेरिका ही दोन्ही राष्ट्रे संरक्षण उत्पादनांच्या क्षेत्रात एकमताने पुढे जाण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत होतील, असा विश्वास केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. अमेरिकेतील द्विपक्षीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
Thank you Secretary Esper.
I look forward to working closely with you for further strengthening and deepening the defence cooperation between our two countries. @EsperDoD https://t.co/mnNWpJXz7z— Rajnath Singh (@rajnathsingh) December 19, 2019
बुधवारी हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात संरक्षण तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाबाबत एक करार करण्यात आला. या बैठकीला राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, बैठक यशस्वी झाली असून यामुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी मजबूत होतील. या बैठकीत दोन्ही देशांमधील अनेक आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांवर, तसेच दहशतवादाविरोधात एकत्र कारवाई करण्याबाबत तसेच पाकिस्तानकडून वारंवार येणार्या धमक्यांबाबतही चर्चा झाल्याचे राजनाथ सिंह यांनी पुढे स्पष्ट केले. यावेळी अमेरिकन परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो हजर होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये पार पडलेल्या या बैठकीत संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापाराशी संबंधित तीन करार करण्यात आले. हिंदुस्थानने पाकिस्तानकडून होणार्या दहशतवादी कागाळ्यांचा मुद्दा उचलल्याचेही त्यांनी सांगितले.
इराणवरही चर्चा
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो म्हणाले की, या बैठकीत आम्ही हिंदुस्थानशी इराणच्या मुद्दय़ावरही चर्चा केली. अमेरिकेने आतापर्यंत इराणवर आपला दबाव कायम ठेवला आहे. त्यामुळेच इराण सरकार आमच्याशी सामान्य व्यवहार करू शकत नाहीत. मात्र आम्ही हिंदुस्थानला इराणमध्ये चाबहार पोर्ट प्रोजेक्ट विकसित करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे याद्वारे हिंदुस्थानला अफगाणिस्तानमध्ये मदत पाठवता येणे शक्य होणार आहे.


























































