
राज्यावर लॉकडाऊनचे संकट घेंगावत असताना राज्य सरकार लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबवत आहे. मात्र लस मिळताना लावलेल्या जाचक अटींचा फटका निराधारांना बसत आहे. आधार कार्ड विना लसीकरणाची नोंदणी होत नसल्याने बेघर निराधार यांना लस मिळण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. कुडाळ तालुक्यातील संविता आश्रमात तब्बल 83 निराधार लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी 44 जणांनी यापूर्वीच कोरोनाशी दोन हात करत यशस्वी लढा दिला आहे. यामुळे या निराधारांना लसीकरणाचा आधार मिळावा अशी मागणी आश्रमाच्या वतीने करण्यात आली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यात कोरोनाचा वाढता आकडा पाहता ग्रामीण भागातील जनतेला सोयीचे व्हावे यासाठी ठिकठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही 12 ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्रांवर ही सेवा देण्यात येत आहे. राज्य सरकारने लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबवत असताना लसीकरणाच्या नोंदणीसाठी अनेक नियम आणि अटी ठेवल्या आहेत. यापैकी आधारकार्डाची असलेली सक्ती रस्तोरस्ती भरकटलेल्या निराधारांच्या मुळावर आली आहे. या निराधारांना लस मिळण्यात अडचणी होत असून ही अट मागे घेण्याची मागणी होत आहे. संविता आश्रमात लॉकडाऊन काळात 44 निराधारांनी कोरोनाशी लढा दिला. यानंतरही दुसरी लाट आली तर यांना कोरोना होण्याचा सर्वाधिक धोका आहे.
सद्यस्थितीत आश्रमात 83 निराधारांकडे आधारकार्ड किंवा कोणतेही शासकीय ओळखपत्र उपलब्ध नाही. यामुळे शासकीय योजनांचा कोणताही लाभ या निराधारांना मिळत नाही. सध्या मिळणाऱया लसीकरणाची प्रामुख्याने गरज या रस्तोरस्ती फिरणाऱयांना आहे. मात्र आधारकार्डच्या सक्तीमुळे लस मिळण्यात अडचणी निर्माण होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले असून या निराधारांना लस देण्यासाठी संस्थेमार्फत पाठपुरावा करणार आहे.
– संदीप परब, संस्थापक,
जीवन आनंद संस्था, संविता आश्रम, पणदूर.



























































