घरच्यांनी लग्नासाठी मुलगा शोधायला सुरुवात केल्याने तरुणीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रविवारी नागपूरमधील गिट्टीखदान परिसरात राहणाऱ्या एका 18 वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एका चिठ्ठीमध्ये आत्महत्येचे कारण लिहिले आहे. घरच्यांनी लग्नासाठी मुलगा शोधायला सुरूवात केल्याने या तरूणीने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समजले. ही तरूणी समलैंगिक होती आणि तिने याबाबत तिच्या पालकांना सांगितलेही होते. तरीही तिच्या घरचे लग्नासाठी मुलगा पाहण्याची जबरदस्ती करत असल्याने या तरुणीने टोकाचे पाऊल उचलले.

मूळचे उत्तर हिंदुस्थानातील हे कुटुंब कामानिमित्त नागपूरमध्ये स्थायिक झाले होते. वडील सरकारी नोकरी करत असून आई गृहिणी आहे. लहान भाऊ शाळेत आहे. बी.ए च्या दुसऱ्या वर्षात शिकत असताना मृत तरूणीने तिच्या समलैंगिकतेबद्दल घरच्यांनजवळ मन मोकळे केले होते. तिच्या इच्छेकडे दुर्लक्ष करत आई वडीलांनी तिच्या लग्नाकरीता मुलं शोधण्यास सुरूवात केली होती. आत्महत्येपूर्वी या तरूणीने चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये आत्महत्येचे कारण तिने सांगितले. “मी लेस्बियन असल्याने माझ्या कुटुंबांने व समाजाने माझ्या लैंगिकतेवर आक्षेप घेतला. मी कोणत्याही मुलासोबत इच्छेविरूध्द लग्न केले तर मी कधीच त्याला सुखात ठेवू शकणार नाही. स्वत:च्या इच्छेनुसार जीवन जगता येत नसल्याने मी हे पाऊल उचलत आहे. माझ्या या कृत्याबद्दल मी तुमची माफी मागते.” असे या चिठ्ठीत लिहिले आहे.

रविवारी दुपारी आई वडील व लहान भाऊ घरात नसताना पंख्याला नायलॉन दोरीच्या सहाय्याने लटकून गळफास घेतला. घरी परतल्यानंतर मुलीला अशा अवस्थेत पाहून आई वडीलांना धक्का बसला. त्यानंतर तातडीने तिला मेयो रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.