पुण्यात हनीट्रॅप अन् खंडणीचा डाव; शहरासह जिल्ह्यामध्ये अनेकांना गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>नवनाथ शिंदे

सोशल मिडीयावरून होणारी मैत्री शहरासह जिल्ह्यातील अनेक नागरिकांना धोकादायक ठरत आहे. विशेषतः तरूणांशी प्रेमाचा बनाव करत आणि शरीरसंबंधासाठी प्रवृत्त केल्यानंतर खंडणी उकळली जात आहे. मात्र, बदनामीपोटी तक्रार देण्यास अनेकांकडून टाळाटाळ केल्यामुळे टोळीचे फावले आहे. बांधकाम व्यावसायिकासह सेवानिवृत्त लष्करी कर्मचाऱ्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून लाखोंची लूट करणाऱ्या टोळीला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. चौकशीदरम्यान टोळीकडून नवीन खुलासे होत असल्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. ग्रामीण भागातील सात ते आठ जणांकडून खंडणी स्वरूपात लाखो रूपये उकळल्याचे उघडकीस आले आहे.

हनी ट्रॅपद्वारे पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळणाऱ्या टोळीतील सहा जणांना कोंढवा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. टोळीतील 19 वर्षांच्या तरुणीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यवसायिकासोबत ओळख निर्माण केली. त्यांना येवलेवाडी परिसरात बोलवून शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्या साथीदारांना बोलवून घेत व्यावसायिकाला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यांच्याकडून पाच लाख रूपयांची खंडणी मागितली होती. बदनामी टाळण्यासाठी व्यावसायिकाने 80 हजारांची रक्कम संबंधितांना दिली होती. मात्र, टोळीने त्यांना त्रास देण्यास सुरूवात केल्यानंतर व्यावसायिकाने कुटुंबियांना विश्वासात घेतले. त्यानंतर झालेला प्रकार सांगून पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. चौकशीत तरुणी अनेकांसोबत संपर्कात असल्याचे आढळून आले होते. त्याशिवाय पुणे ग्रामीण परिसरातील सहा ते सात नागरिकांकडून अशाच पध्दतीने लाखो रूपयांची खंडणी उकळल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, समाजामध्ये बदनामी होईल या भीतीने पोलीस ठाण्यात कोणी तक्रार देण्यास पुढे आले नाही. टोळीला कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, योगेश कुंभार, महेश राठोड, अभिजित रत्नपारखी यांनी आरोपींना अटक केली.

शहरासह जिल्ह्यातील अनेकजण जाळयात अडकले
शहरासह जिल्ह्यात सोशल मीडियाद्वारे ओळख वाढवून नागरिकांकडून खंडणी उकळण्याचा डाव यशस्वी झाल्यानंतर टोळीचे धाडस वाढले होते. त्यानुसार गुन्ह्यातील तरूणीकडून इन्स्टाग्रामद्वारे उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, इतर व्यावसायिकांकडून लक्ष्य केले जात होते. मेसेजद्वारे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकाची देवाण-घेवाण केल्यानंतर ओळख वाढविण्यास प्राधान्य दिले जाते. त्यानंतर चहा किंवा कॉफी पिण्याच्या बहाण्याने संबंधिताला बोलावून शरीरसंबंधासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर तरूणी साथीदारांना फोन करून बोलावून घेत होती. तुम्ही माझ्यावर बलात्कार केला आहे, तुमच्याविरूद्ध पोलीस तक्रार करते, अशी भीती दाखवून टोळक्याकडून व्यावसायिकांना लाखो रूपयांची खंडणी मागितली जात होती. बदनामी टाळण्यासाठी काहीजणांनी टोळीला लाखो रूपये दिल्याचे उघडकीस आले आहे.

अनोळखी लोकांशी मैत्री टाळा
नागरिकांची फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील ओळखीतून फसवूकीचा डाव रचल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे. सोशल मीडियातून ओळखीचे रूपांतर खोट्या प्रेमात करून खंडणी उकळली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अनोखळी मैत्रिणीपासून दूर राहण्याचे आवाहन पुणे ग्रामीणसह शहर पोलिसांनी केले आहे. फसवणूकीचा प्रयत्न करणाऱ्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.