
रश्मी अनपट – अमित खेडेकर यांना कश्मिरमधील क्षण नेहमीच लक्षात राहतील.
मधुचंद्र म्हणजे – आयुष्यभर लक्षात राहणारी आठवण.
फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले? – फिरायला जायचे प्लॅनिंग वगैरे आम्ही केले नव्हते. ते अचानकच ठरले. झालं असं की आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे आम्ही ठरवलं की बाईक राईड करायची. आम्ही भूतानला जायचे ठरवले होते, पण मला जास्त सुट्टय़ा मिळत नव्हत्या. एकंदरीत सगळं बघता आम्ही शेवटी ठरवलं की बाईक रायडिंग करणं शक्य नाही होणार. मग भूतान रद्द करून कश्मीरला जायचे ठरले. तिथे छान फिरलो,
तिथे आवडलेले ठिकाण – कश्मीरमध्ये मला पहलगाम आवडले.
ठिकाणाचे वर्णन – कश्मीर म्हणजे स्वर्ग. यासाठी दुसरा शब्द असूच शकत नाही. निसर्गाने केलेली मुक्त उधळण इथे पाहायला मिळाली.
तिथे केलेली शॉपिंग – कश्मीरचे पश्मिना सिल्क फार प्रसिद्ध आहे. तिथे मी साडी, शॉल, स्वेटर अशी बरीच शॉपिंग केली होती.
काही खास क्षण – मला असे वाटते की ज्याक्षणी आपण मधुचंद्रासाठी निघतो त्या क्षणापासून परत येईपर्यंत त्यातला प्रत्येक क्षण खास असतो. आम्ही तिथे सात-आठ दिवस होतो ते सगळे दिवस आमच्या अजूनही डोळ्यांसमोर आहेत. त्यातल्या त्यात खास आठवण अशी की आम्ही तिथे शिकारा राईडवर बसलो होतो. तेव्हा अमितने एका पॉइंटला शिकारा स्वतः चालवायला घेतली आणि मस्त रोमॅण्टिक गाणी गात तो शिकारा चालवत होतो, तो क्षण माझ्यासाठी फार खास होता.
मधुचंद्र हवाच की… – मधुचंद्र नक्कीच हवा. मला तर वाटतं, आयुष्यात एकदाच नाही तर दरवर्षी प्रत्येक जोडप्याने वर्षातून एकदा थोडे दिवस आपल्यासाठी वेळ काढून नक्की कुठेतरी फिरायला जावे आणि एकमेकांसोबत चांगले क्षण घालवावेत, चांगला वेळ घालवावा. आम्ही दोघंही दरवर्षी प्लॅन करतो की किमान चार-पाच दिवस वेळ काढून जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवतो.
एकमेकांना ओळखण्यासाठी किती दिवस द्यावेत…– किमान आठ दिवस तरी द्यावेत. लग्नाआधी आम्ही अडीच ते तीन वर्षे एकमेकांना डेट करत होतो. तेव्हा दिवसाआड भेटत होतो, पण कितीही झाले तरी आपण पूर्णवेळ एकत्र नसतो. लग्नानंतर आपण पूर्णवेळ एकमेकांसोबत असतो. तेव्हा आपल्याला एकमेकांना जास्त ओळखता येतं आणि समोरच्याचा स्वभाव पूर्णपणे कळतो.
अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिसिझम – अमित जर सोबत असेल तर ते ठिकाण अनोळखी असो किंवा ओळखीचे असो, मला नाही वाटत की मला काही फारसा फरक पडेल. त्याला एकंदरीत मी कशी आहे, काय आहे हे चांगलेच माहीत आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही ठिकाणी जरी गेलो तरी रोमॅण्टिसिझम होऊ शकतो. ते ठिकाण ओळखीचे असेल तर चांगलेच, पण नसेल तरी फारसा फरक पडणार नाही.फक्त अमित सोबत हवा.
जोडीदाराची खास आठवण? – पहेलगाममध्ये एक मिनी स्वित्झरलॅण्ड म्हणून ठिकाण आहे. तिथे वर जायचा रस्ता थोडा कठीण असल्याने तिथे घोडय़ावरूनच जावे लागते. मी त्याआधी कधी घोडय़ावर बसले नव्हते. मी अमितला सांगितले, घोडय़ावर मी बसणे शक्यच नाही. मला खूप भीती वाटते. पण तो म्हणाला, तू करू शकतेस. तू बस. एक काम करू या. आधी आपण एकाच घोडय़ावर दोघे जाऊया आणि काही अंतर कापल्यावर आपण वेगवेगळ्या घोड्यांवर बसूया. थोडय़ा अंतरावर गेल्यावर अमितला बोलले, अमित, आता मजा येतेय. आता भीती नाही वाटत. मग दोघंही वेगवेगळ्या घोडय़ांवर वरपर्यंत गेलो. चहा प्यायलो, कश्मीरी ड्रेस घालून फोटो काढले. मला असे वाटते, प्रत्येकाला असाच जोडीदार हवा असतो की तो आपल्यातली भीती, नकारात्मक गोष्टी जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करतो. अमित माझी भीती घालवून टाकतो. ही ती खास आठवण. त्याच्या प्रोत्साहनामुळे मी घोडय़ावर बसले.
मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – आम्ही लग्नाआधी एका नाटकात काम करत होतो. तिथे आमची ओळख झाली आणि मग पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि मग आम्ही दिवसाआड भेटत होते. जेवढा वेळ शक्य होतं तेवढा वेळ एकमेकांसोबत घालवत होतो. मग लग्न झाल्यानंतर जी प्रत्येक मुलीला भीती असते की आता नवीन घरात ऍडजस्ट कसे होणार, पण अमितने मला सांभाळून घेतले आणि जितकं प्रेम त्याने मला दिलं, तितकंच प्रेम त्याच्या आई-बाबांनी दिले. खूप शांतपणे समजतो मला. जसा प्रत्येक मुलीला जोडीदार हवा असतो तसा मला जोडीदार मिळाला असं नक्कीच वाटतं. आमचा पाच वर्षांचा संसार छान झाला, पुढेही असाच छान होईल यावर माझा विश्वास आहे.



























































