नवं टेन्शन! हाँगकाँगमध्ये पसरतोय गूढ आजार, आतापर्यंत 7 जणांचा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील कोरोनाचे संकट अजून संपले नसताना हाँगकाँगमध्ये पसरलेल्या गूढ आजाराने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. हाँगकाँगच्या मासे-मटण मार्केटमधील गोडय़ा पाण्यातील माशांपासून घातक विषाणूचा संसर्ग फैलावू लागला आहे. त्यात आतापर्यंत 7 नागरिकांचा बळी गेला आहे. जवळपास 88 लोकांना बाधा झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन हादरून गेले आहे.

स्थानिक आरोग्य प्रशासनाने नागरिकांना अॅलर्ट जारी करताना सी फूड आणि गोडय़ा पाण्यातील मासे न खाण्याच्या सूचना दिल्या आहेत. गूढ आजाराचे बळी ठरलेल्या व्यक्तींना एसटी-283 स्ट्रेनच्या विषाणूचा संसर्ग झाला होता. दोन महिन्यांत 79 जणांना हा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आरोग्य प्रशासन हादरले आहे. गुरुवारी आणखी 9 जणांना गूढ आजाराची लागण झाल्याने या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या 88वर गेली आहे. बाधित व्यक्तींपैकी अनेक जण मासेमारी करणारे असून ते हातांनीच मच्छी हाताळायचे. त्यातील काही जण हाताला जखमा असतानाही मासे हाताळत होते. त्यातूनच घातक विषाणूचा संसर्ग पसरल्याची शक्यता हॉंगकॉंगच्या आरोग्य क्षेत्रातील आघाडीची संस्था ‘सीएचपी’ने वर्तविली आहे.

संसर्गाचा शरीरावर आघात

एसटी-283 स्ट्रेनच्या विषाणूचा संसर्ग मनुष्याच्या शरीरावर घातक स्वरुपाचा परिणाम करीत आहे. या संसर्गाचा रक्त, हाडे आणि फुफ्फुसांच्या क्रियांवर परिणाम होतो. विशेषतः लहान मुले, वयस्कर व्यक्ती किंवा आधीपासून एखादा आजार असलेल्या लोकांना या विषाणू संसर्गाचा धोका अधिक आहे. या गूढ आजाराची कुठलीही लक्षणे दिसत नाहीत, असे आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे.