हॉन्ग-कॉन्गमध्ये चीन नरसंहाराच्या तयारीत, लाखो आंदोलकांवर सैन्य कारवाईची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉन्ग-कॉन्गमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून लाखो लोकं चीनविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. लाखो लोकांचे हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी चीनने नरसंहाराची तयारी केली आहे. चीनने आंदोलनकर्त्यांना दहशतवादी म्हटले असून हॉन्ग-कॉन्ग सीमेजवळ सैन्य तैनात केले आहे. 10 मिनिटांमध्ये आंदोलनकर्त्यांवर सैन्य कारवाई करून नरसंहार करण्याचा चीनचा हेतू आहे.

हॉन्ग-कॉन्गमधील आंदोलनकर्त्यांना घाबरवण्यासाठी चीनने सीमेवर सैन्याच्या हत्यारबंद गाड्या उभ्या केल्या असून हजारो सैनिक जमा केले आहे. सैनिकांनी या ठिकाणी एक मार्च काढत आंदोलकर्त्यांना इशारा दिला. तसेच चिनी सैन्याने आंदोलनकर्त्याना थेट इशारा देत ‘आम्हाला हॉन्ग-कॉन्गमध्ये पोहोचण्यासाठी फक्त 10 मिनिटं लागतील’, अशी धमकी दिली आहे.

कश्मीरवर पाकड्यांना साथ, हॉन्ग-कॉन्गवर तोंडघशी
एकीकडे जम्मू-कश्मीर मुद्द्यावर चीनने अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानची साथ दिली आहे, तर दुसरीकडे हॉन्ग-कॉन्गच्या मुद्द्यावरून तोंडघशी पडले आहेत. चीनने पाकिस्तानसोबत मिळून जम्मू-कश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेण्याची तयारी केली आहे. या ठिकाणी या मुद्द्यावर त्यांना मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हॉन्ग-कॉन्गच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राने महत्त्वाची बैठक आयोजित केली असून चीन सरकारला येथे उत्तर द्यावे लागणार आहे.

30 वर्षापूर्वीचा नरसंहार
हॉन्ग-कॉन्गमध्ये पोहोचण्यासाठी फक्त 10 मिनिटं लागतील या चिनी सैन्याच्या धमकीचा संबंध थेट 30 वर्षापूर्वीच्या घटनेशी आहे. 4 जून, 1989 रोजी लोकशाहीच्या मागणीसाठी थियानमेन चौकात लाखो तरुण, तरुणी, विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनावर चीनने सैन्य कारवाई केली होती. आंदोलन चिरडण्यासाठी चीनने रणगाडे उतरवले होते. यात तब्बल 10 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.