
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या माथेरानमधील घोड्यांना डोळ्यांचा विचित्र आजार जडला आहे. या रोगामुळे घोड्यांना अंधत्वाचा धोका निर्माण झाला आहे. लाल, पिवळे डोळे झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत दृष्टी कमी होत असून आतापर्यंत २० घोड्यांना या रोगाची लागण झाली आहे. या रोगामुळे अश्वपालक चिंतेत असून माथेरानमधील पर्यटन धोक्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून माथेरानमधील पशुवैद्यकीय दवाखाना बंद असल्यामुळे घोड्यांवर उपचार कसे करायचे या विवंचनेत अश्वपालक आहेत. माथेरानमध्ये ४६० प्रवासी आणि ३५० मालवाहतूक करणारे अश्व आहेत. यापूर्वी कधीही अशा आजाराची नोंद झालेली नसल्याचे स्थानिक अश्वपालकांचे म्हणणे आहे. या आजारावरील उपचार खर्चिक आहेत. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. या विचित्र आजारामुळे नव्या पर्यटन हंगामाच्या तोंडावरच माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर चिंतेचे सावट आले आहे.
काय आहेत लक्षणे?
घोड्यांना अंधत्वाचा विचित्र आजार वेगाने पसरत आहे. सुरुवातीला घोड्यांचे डोळे राखाडी होतात, नंतर पिवळे आणि लालसर दिसतात. अवघ्या ७२ तासांत वेगाने लक्षणे पसरत असून चार ते पाच दिवसांत घोड्यांची दृष्टी जाते. यानंतर घोडे तबेल्यात उड्या मारणे, तोडफोड करतात.
पुण्यातील अहवालानंतरच निदान
घोड्यांना अंधत्वाचा धोका निर्माण झाल्यानंतर माथेरानमधील अश्वपालकांनी पुणे येथील अश्वसेवा संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल लहाने यांच्याशी संपर्क साधला. यानंतर डॉ. लहाने यांच्यासह संस्थेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी माथेरानमध्ये येऊन घोड्यांची तपासणी केली. घोड्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच या आजाराचे
नेमके निदान होणार आहे.
घोड्यांची दृष्टी कमी होत असल्यामुळे पर्यटकांनाही धोका निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे माथेरानमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना असला तरी तो सध्या बंद आहे. सुविधा अपुऱ्या असल्याचे कारण देत जुलैपासून दवाखाना बंद आहे. त्यामुळे तातडीने पशुवैद्यकीय डॉक्टरांची कायमस्वरूपी नेमणूक करावी, अशी मागणी अश्वपालकानी केली आहे.