
कोंढव्यात मंगळवारी झालेल्या खून प्रकरणातील आरोपीचे घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे कृष्णानगर परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोढवा खून प्रकरणातील संशयित आरोपी आकाश लाला मस्के याचे हे घर आहे. मंगळवारी विठ्ठल धांडे (वय 35, रा. कोंढवा) याचा खून करण्यातच आला होता. या खुनाबद्दल आकाशला अटक करण्यात आली होती.
कोंढवा खून प्रकरणातील आरोपीचे घर जाळले pic.twitter.com/gaU1dcLFoi
— Saamana (@Saamanaonline) October 7, 2020
मयत विठ्ठल आणि त्याचे मित्र मंगळवारी कृष्णानगर भागात दारू पिण्यास बसले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाल्यामुळे आरोपींनी विठ्ठलला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी तीन पुरुषांसह दोन महिलांना अटक केली. त्यामध्ये आरोपी आकाश म्हस्के याचाही समावेश होता. या खुनाच्या रागातून बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी आकाशचे घर पेटवून दिले. अज्ञातांनी लावलेल्या आगीत आरोपी आकाशच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. त्याशिवाय इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. आग कोणी लावली हे मात्र अझून कळू शकलेलं नाहीये.



























































