सिलेंडरच्या स्फोटाने गावरईतील घराला आग, 9 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याने गावरई देऊळवाडी येथील भागोजी मांडरे यांचे राहते घर जळून पूर्णपणे खाक झाले. यात कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी झालेली नसली, तरी आर्थिक नुकसान मात्र खूपच मोठे झाले आहे.

दापोली तालुक्यातील पन्हाळेकाजी ग्राम पंचायतीच्या दप्तरी नोंद असलेले गावरई देऊळ वाडी येथील मालमत्ता क्रमांक 334 या निवासी घरात भागोजी हरि मांडरे, मंगला देवजी मांडरे आणि गंगाराम हरि मांडरे ही 3 कुटुंबे राहत होती. मंगळवारी 2 मे रोजी सकाळी घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याने मांडरे यांचे घर सिलेंडरच्या स्फोटाच्या आगीत पूर्णतः जळून खाक झाले. याबाबतचा महसूल विभागाकडून रितसर पंचनामा करण्यात आला आहे. या पंचनाम्यात 9 लाख 26 हजार 600 रुपयांचे नुकसान झाल्याचे दाखविण्यात आले आहे.

गावरई देऊळवाडी येथील हे घर हरि पांडूरंग मांडरे यांचे नावे असून ते मयत झाले आहेत. त्यांच्या पश्चात या घरात भागोजी हरि मांडरे, मंगला देवजी मांडरे आणि गंगाराम हरि मांडरे ही 3 वेगवेगळी कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. त्यातील मंगला देवजी मांडरे आणि गंगाराम हरि मांडरे हे मुंबईत कामानिमित्त राहत असून भागोजी हरि मांडरे हे या घरात कायम वास्तव्य करीत आहेत. भागोजी मांडरे यांच्या घरी असलेला घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याने मांडरे यांच्या घराला आग लागली. वाडीत हे वृत्त समजताच गावरई देऊळवाडीतील सर्व ग्रामस्थांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याचप्रमाणे गावरई गावातीलही ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. मात्र आग चांगलीच भडकली त्यात भागोजी मांडरे यांचे दागदागिने, कपडालत्ता, भांडीकुंडी, धान्य, कागदपत्रे आदींसह घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या.

पन्हाळेकाजी ग्राम पंचायतीचे सरपंच दिनेश जावळे, पोलीस पाटील पांडुरंग कुटरेकर, प्रकाश पवार, संदिप कुटरेकर, करण कानसे आदी ग्रामस्थांसह गावरई देऊळवाडी आणि गावरई गावातील ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. महसूल विभागाकडून शिरवणे तलाठी श्रीमती अधिकाऱ्यांनी घटनेचा रितसर पंचानामा केला असून या पंचनाम्यावेळी प्रत्यक्ष जागेवर सरपंच दिनेश जावळे, पोलीस पाटील पाडुंरंग कुटरेकर, ग्रामसेवक आनंद श्रीखंडे, महादेव माने, सतिष जावळे, पांडरंग तांबे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.