
ICC T20 World Cup 2026 मध्ये हिंदुस्थानने न्यूझीलंडला नमवत विश्वविजेतेपदावर नाव कोरले आहे. या विजयासह हिंदुस्थानने तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप उंचावण्याची किमया साधली. टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरात फटाके वाजवत डीजेच्या तालावर तरुणाई तिरखली. संघावर कौतुकांचा वर्षाव झालाच, पण पैशांचाही पाऊस पडला आहे.
ICC ने या स्पर्धेसाठी एकूण 120 कोटी रुपयांची रक्कम बक्षीस स्वरुपात ठेवली होती. अंतिम फेरीतील विजेता आणि उपविजेता यांच्यासह सेमी फायनलमध्ये बाद झालेल्या संघांनाही विशिष्ट रक्कम देण्यात आली आहे. विशेष म्हणजे साखळी फेरीत बाद झालेल्या संघांनाही फुल ना फुलाची पाकळी स्वरुपात पैसे देण्यात आले आहेत.
टीम इंडियाला विश्वविजेते बनल्याबद्दल 3 मिलियन अमेरिकन डॉलर्स, म्हणजेच हिंदुस्थानी चलनात सुमारे 27.48 कोटी रुपये मिळाले आहेत. विशेष म्हणजे, ही रक्कम मागील विश्वचषकाच्या तुलनेत 4 कोटींनी अधिक आहे. तर उपविजेते न्यूझीलंडला 14.65 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. याच बरोबर स्पर्धेतून बाहेर पडलेल्या सेमी फायनल आणि सुपर 8 मधील संघांनाही बक्षीस रक्कम देण्यात आली आहे.
बॉल हरवल्याची तक्रार करू नका! हिंदुस्थानच्या ऐतिहासिक विजयावर पोलीस दलाचे भन्नाट ट्विट
उपांत्य फेरीतील पराभूत संघ इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांना प्रत्येकी 7.24 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर सुपर 8 मध्ये बाद झालेल्या झिम्बाब्वे, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानला प्रत्येकी 3.48 कोटी रुपये देण्यात आले आहेत. याचबरोबर साखळी फेरीत बाद झालेल्या ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, कॅनडा, युएई, यूएसए, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नेपाळ, आयर्लंड, इटली, ओमान आणि नामीबिया या 12 संघांना प्रत्येकी 2.29 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
























































