
वेळ आणि शारीरिक कष्ट वाचवण्याकरिता बऱ्याच घरात कपडे धुण्याकरिता वॉशिंग मशीन वापरतात, पण काही जणांना अजूनही वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला आवडत नाहीत; कारण त्यांचा असा समज असतो की, वॉशिंग मशीनमध्ये कपडे स्वच्छ धुतले जात नाहीत. कपड्यांच्या चमकदार धुलाईकरिता काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर वॉशिंग मशीनमध्येही स्वच्छ कपडे धुतले जाऊ शकतात. याविषयी सोशल मिडीयावर प्रश्न विचारण्यात आला होता.
वॉशिंग मशीनमध्ये कपडे स्वच्छ निघण्यासाठी काही युक्त्या असतील तर सांगता का? Quora या प्रश्नोत्तराच्या मंचावर या प्रश्नाला विनित संखे यांनी पुढील उत्तर दिले आहे.
– कधीही वॉशिंग मशीन कमी पाण्यात वापरू नये. पूर्ण ऑटोमॅटिक (सेमी ऑटोमॅटिक नाही.) वॉशिंग मशीन घ्याव्यात आणि ऑटो मोडमध्ये चालव्यावात.
– प्रत्येक आधुनिक वॉशिंग मशीनमध्ये आजकाल थंड आणि गरम पाण्याचे दोन वेगवेगळे इन्लेट असतात. जर घरी गॅस गिझर असेल तर त्यातून जाणारे गरम पाण्याचे कनेक्शन मशीनचा गरम इन्लेटला लावावे. मशीन स्वतःच गरम पाणी घेऊ लागते. (कारण हे गिझर गरम पाणी हवं असतं तेव्हा स्वतःच चालू बंद होतात.) गरम पाण्यात कपडे अत्यंत स्वच्छ निघतात. माझा अनुभव आहे.
– मशीनमध्ये असलेले लिंट फिल्टर (जिथे कपड्यांची मळी अडकते ते) वेळोवेळी स्वच्छ करावेत. धुताना कपड्यांमध्ये 2-3 काटेरी प्लास्टिक बॉल्स टाकावेत. हे बॉल्स मळी खूप छान काढतात; परंतु त्यांना स्पिन ड्राय करण्याआधी काढून घ्यायचे असते.
– मशीनमध्ये कधीही तडक डेटॉल टाकू नये. आधी बादलीत कपडे भिजवून त्यात डेटॉल टाकून ते एकदा पिळून मग मशीनमध्ये टाकावेत. मशीनची मळी बाहेर सोडणारी पाण्याची मोटार डेटॉलमुळे खराब होते आणि घाण पाणी मशीनमध्येच (दिसत नसले तरी) आत साचून राहते.
– वॉशिंग पावडरसहित फॅब्रिक कंडिशनरसुद्धा वापरावा. कपडे सुवासिक, मऊ, आकर्षक, रंग न जाणारे निघतात. कपड्यांची पत (quality) बराच काळ टिकून राहते.


























































