मन:स्वास्थ्य कसे जपाल? वाचा सोपे उपाय !

तणाव, कार्यालयीन कामाची जबाबदारी, शारीरिक थकवा या साऱ्याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर होत असतो. मानसिक आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल तर दैनंदिन जीवनातील काही छोट्या आणि सोप्या गोष्टींची सवय लावून घेणे आवश्यक आहे.

सकाळच्या वेळी बरेच जण कामाच्या गडबडीत नाश्ता करायचे टाळतात. काही जण तर घाईच्या वेळी बाहेरचं फास्ट फूड खायला प्राधान्य देतात. जर तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहायचे असेल तर सकाळी पोटभर पौष्टिक न्याहारी करूनच घराबाहेर पडा.

ऑफिस, तुमच्या इमारतीच्या सोसायटीत किंवा आजूबाजूच्या परिसरात योगा, मेडिटेशन, आवड असल्यास नृत्य अशा उपक्रमांत आवर्जून सहभागी घ्या. यामुळे शारीरिक व्यायाम होईलच शिवाय मानसिक उत्साहही जाणवू लागेल.

एखादी गोष्टीचा तुम्हाला मानसिक त्रास होत असेल तर त्याविषयी तुमच्या जवळच्या व्यक्तीकडे मनमोकळेपणाने बोला. तणाव दूर व्हावा याकरिता त्यावर उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न नक्की करा.

वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात संतुलन राखायला शिका. मानसिक स्वास्थ्यासाठी हे फारच आवश्यक आहे. तसेच घरगुती वादविवाद, वैयक्तिक अडचणी याचा परिणाम कामावर होणार नाही याची काळजी घ्या. ऑफिसमधल्या समस्या सायंकाळी ऑफिसमधून बाहेर पडाल तेव्हा तिथेच सोडा. घरी आल्यावर त्यावर विचार करत बसू नका.

ऑफिसमध्ये तुम्ही ज्या डेस्कवर काम करता. तिथे सजावट करा. तिथे फुले, देवाचा फोटो किंवा जे बघून तुमच्यामध्ये सकारात्मकता येईल, अशा वस्तू ठेवा. जेणेकरून काम करताना तुम्हाला उत्साह वाढेल.

काही वेळा असे होऊ शकते की, एखादी व्यक्ती किंवा जागेबाबत नकारात्मकता जाणवते. एखाद्या व्यक्तिचे बोलणे आवडत नाही. अशा व्यक्तिंचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. त्यावर जास्त विचार करू नका. आयुष्य आनंदाने जगा.

आपली प्रतिक्रिया द्या