तुमचा फोन हॅक झालाय हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर

सध्या तंत्रज्ञानाची प्रगती झाल्याचे अनेक दुष्परिणामही समोर येत आहेत. कॉम्प्युटरसोबत फोनही हॅक होऊ लागले आहेत. काही हॅकर्स तुमच्या फोनमध्ये शिरून तुमची महत्त्वाची माहितीही चोरत असू शकतात. पण, त्यासाठी तुम्हाला आधी हे ओळखावं लागेल की तुमचा फोन हॅक झाला आहे का?

तुमचा फोन हॅक झालेला असेल तर तुम्हाला त्यात काही बदल दिसू लागतात. त्यावरून आपण हॅकिंगचा अंदाज लावू शकतो. त्याचं सगळ्या मोठं चिन्ह हे आहे की, तुमचा पॅकेट डेटा अधिक वापरला जातो. तुमच्या फोनमध्ये जर हॅकरने मॅलशियस सर्वर टाकला असेल तर तो सर्वर मालवेअर डाउनलोड करत राहतो आणि स्वतःला अपडेट ठेवतो. त्यामुळे तुमचा डेटा खूप जास्त प्रमाणात वापरला जातो.

तुमच्या फोनची बॅटरीही अचानक झपाट्याने कमी होऊ लागते. अनेकवेळा मालवेअर असलेले अनेक अॅप्स बॅकग्राऊंडला सुरू असतात. त्यामुळे तुमची बॅटरी जास्त लवकर संपू लागते आणि तुम्हाला फोन वरचेवर चार्ज करावा लागतो किंवा तो वारंवार रिस्टार्ट होत राहतो.

तुमच्या फोनचा एकूण परफॉर्मन्सही कमी होऊ लागतो. अनेक अॅप्स जर तुमच्या फोनमध्ये तुम्ही डाऊनलोड न करताच इन्स्टॉल होत असतील तर तुम्ही वेळीच सावधान होणं गरजेचं आहे. तुमची रोजची अॅप्लिकेशन हँग होणं, अचानक फोनवर पॉपअप जाहिराती सुरू होणं, हेही फोन हॅक झाल्याचं एक लक्षण असू शकतं.

जर यातील अनेक गोष्टी तुमच्या फोनमध्ये दिसत असतील तर ताबडतोब त्यावर योग्य ती कारवाई करा. सगळ्यात आधी आपल्या फोनला फॅक्टरी रिसेट मोडवर टाका. त्याखेरीज आपला बँकिंग पासवर्ड, ईमेल्स आणि इतर अकाउंट्सचे पासवर्ड ताबडतोब बदला.

हॅकिंगपासून वाचण्यासाठी काही नियम आवर्जून पाळा. कोणतंही अॅप्लिकेशन अॅप स्टोअर वरूनच डाऊनलोड करा. कोणतीही अनोळखी लिंक किंवा वेबसाईट उघडून पाहू नका किंवा अॅप इन्स्टॉल करू नका. पब्लिक वायफाय वापरतानाही ही काळजी घ्या. तसंच आवश्यकता वाटल्यास एखादा चांगला अँटिव्हायरसही फोनमध्ये वापरा.

आपली प्रतिक्रिया द्या