नापासांना कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा आधार, बारावीच्या विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावणार

308
(फोटो - चंद्रकांत पालकर, पुणे)

बारावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा आधार आहे. बारावीच्या नियमित परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी फेरपरीक्षेला बसतात. या फेरपरीक्षेतही नापास झाल्यास या विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देणाऱया कौशल्य विकास अभ्यासक्रमाच्या परीक्षेला बसता येणार आहे.

दहावीबरोबरच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरूनही शालेय शिक्षण विभागाने नापास हा शेरा काढून टाकला. याविषयीचा अध्यादेश गुरुवारी जारी झाला आहे. नापास शेरा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होत असल्याने हा बदल करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण असणाऱया विद्यार्थ्यांना उत्तीर्ण असा शेरा मिळणार आहे. नियमित परीक्षेत श्रेणी विषयासह दोन किंवा तीन विषयांत नापास झाल्यास नापास ऐवजी ‘फेरपरीक्षेसाठी पात्र’ असा शेरा मिळणार आहे. त्याचबरोबर नियमित परीक्षेत श्रेणीविषयासह तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयात नापास झाल्यास फेरपरीक्षेसाठी पात्र हाच शेरा मिळणार आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱया फेरपरीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास त्याला उत्तीर्ण हा शेरा मिळेल. तसेच श्रेणी विषयास एक किंवा दोन विषयांत नापास झाल्यास फेरपरीक्षेसाठी पात्र हाच शेरा मिळेल व जास्त विषयात नापास झालेला विद्यार्थी कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र ठरणार आहे.

 दहावी व बारावी परीक्षेत नापास होणाऱया विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची योजना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद राबवित आहे. मात्र योजनेला अद्याप राज्यभरात मिळावी तशी प्रसिद्धीच मिळालेली नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच या अभ्यासक्रमाची निवड विद्यार्थ्यांना करता येत नाही. सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत 4 हजार 493 विद्यार्थ्यांनीच हा अभ्यासक्रमाची निवड केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या