बारावीची परीक्षा देताना अल्पवयीन विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना ऑनलाईन । हैदराबाद

बारावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना हैदराबाद येथे घडली आहे. गोपी राजू (16) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, गोपी हा येलारेड्डीगुडा येथील सरकारी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. सिकंदराबाद येथील श्री चैतन्य नावाचं महाविद्यालय त्याला परीक्षा केंद्र म्हणून आलं होतं. तिथेच हा प्रकार घडला. शनिवारी पेपर सुरू झाल्यानंतर गोपीने उत्तर पत्रिकेत प्रश्न सोडवायला सुरुवात केली. मात्र लिहिता लिहिता अचानक तो त्याच्या बेंचवरून कोसळला. त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. गोपीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. गोपीला आधीपासूनच वरचेवर छातीत दुखत होतं. मात्र, तरीही तो परीक्षा देण्यासाठी आला होता.