
सामना ऑनलाईन,मुंबई
मराठी माणसाला त्याच्या सामर्थ्याची जाण करून देत त्याच्या मनगटातील ताकद जागवणारे मराठी अस्मितेचे मेरूमणी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या 17 नोव्हेंबरला महानिर्वाण दिन. हिंदुत्व, हिंदुस्थान आणि हिंदूंच्या रक्षणासाठी शिवसेनाप्रमुखांचा आशीर्वादही सदैव लाभला. महाराष्ट्रासह हिंदुस्थानचा श्वास आणि ध्यास असणाऱया आपल्या लाडक्या साहेबांना मानवंदना देण्यासाठी देशभरातून असंख्य हिंदू, शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा अलोट भक्तिसागर उद्या शनिवारी शिवतीर्थावरील स्मृतिस्थळी उसळणार आहे.
शिवसेनाप्रमुख म्हणजे प्रत्यक्ष शिवतेज. या शिवतेजाने महाराष्ट्रच नव्हे तर अखंड हिंदुस्थानातील जनतेमध्ये देव, देश आणि धर्माबद्दलचा स्वाभिमान जागृत केला. मराठी माणसाच्या मनात अस्मितेची मशाल सदैव तेवत ठेवली. 17 नोव्हेंबर 2012 रोजी हे शिवतेज अनंतात विलीन झाले. मात्र त्या तेजाचा प्रकाश आजही त्यांच्या धगधगत्या विचारांच्या रूपाने कायम आहे. मराठी माणसाला त्यांच्या विचारांतून स्फूर्ती मिळत राहते. त्यांच्या पवित्र स्मृतींना मानवंदना देण्यासाठी विराट जनसागर उद्या शिवतीर्थावर दाखल होईल आणि भक्ती-शक्तीचा अपूर्व संगम होईल.
तुम्ही सूर्य अम्हां दिला कवडसा
गुरूने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
पिता बंधु-स्नेही तुम्ही माउली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य अम्हां दिला कवडसा।
जिथे काल अंकुर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा!
शिकू धीरता, शूरता, वीरता
धरू थोर विद्येसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा!
जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे ठसा!
तुझी त्याग-सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ति राहील दाही दिशी
अगा पुण्यवंता भल्या माणसा!
कवी-जगदीश खेबूडकर






























































