
देशात अनेकजण असे आहेत जे पितृपक्षात नवीन कामे सुरू करत नाहीत. नव्या गोष्टीची खरेदी करणंही लोकं या काळात टाळतात. त्यामुळे या काळात बहुतेक उत्पादनांची विक्री कमी होते असे सांगितले जाते, मात्र यंदाच्या पितृपक्षात टीव्हीची मागणी अचानक वाढली असून ग्राहक मोठ्याप्रमाणावर टीव्ही खरेदी करत आहेत. सर्वसाधारणपणे नवरात्र किंवा दिवाळीत घरात लागणाऱ्या उपकरणांच्या विक्रीला जोर आलेला असतो. यावर्षी पितृपक्षातही टीव्ही विक्री जोमाने सुरू असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. खासकरून मोठ्या आकाराच्या टीव्हींची मागणी बरीच वाढली आहे. जवळपास सगळ्याच कंपन्यांच्या टीव्हींना मोठी मागणी असून या कंपन्यांची वाढती मागणी पूर्ण करताना दमछाक होत आहे. अचानक वाढलेल्या मागणीमुळे विक्रीवरच नाही तर टीव्ही घरपोच करणे आणि तो बसवून देणे या यंत्रणेवरही ताण आला आहे.
हिंदुस्तान पाकिस्तान सामन्यामुळे मागणी
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली आहे. यंदाचा वर्ल्डकप हा हिंदुस्थानात होत असल्याने मायदेशात हिंदुस्थान पुन्हा जिंकेल अशी क्रिकेटप्रेमींना आशा वाटते आहे. या स्पर्धेतील सगळ्यात मोठे आकर्षण हे हिंदुस्तान-पाकिस्तान मुकाबला आहे. महागडी तिकीटे काढून मैदानात जाऊन उकाडा सहन करत, गर्दीत सामना बघण्याऐवजी घरी एसीची हवा खात सामना बघणे अनेकांना पसंत असते. हा सामना बारकाईने पाहता यावा यासाठी चांगल्या दर्जाच्या, मोठ्या आकाराच्या टीव्हींना मागणी आल्याचे सांगितले जात आहे.
शुक्रवारी आणि शनिवारी टीव्हीची मागणी ही अजून वाढण्याची शक्यता आहे. ही मागणी धनत्रयोदशीच्या मागणीइतकी असेल असे सांगितले जात आहे. रविवारी हिंदुस्तान-पाकिस्तान सामना असल्याने त्याआधी घरात नवीन टीव्ही यावा यासाठी अनेकजण धडपड करत आहेत. 55 इंच आणि त्यापेक्षा अधिक मोठ्या आकाराच्या टीव्हीला असलेली मागणी ही गेल्या पितृपक्षाच्या तुलनेत 2.5 पटीने अधिक असल्याचे एलजी इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ही मागणी अशीच कायम राहिली तर आमच्याकडचा नोव्हेंबरपर्यंत साठा संपून जाईल अशी चिंता एका टीव्ही कंपनीच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.
























































