‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ला खवय्यांचा भरपेट प्रतिसाद, सीएसएमटीनंतर आता एलटीटीतही चाकावरचे हॉटेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ला खवैयांचा तुडुंब प्रतिसाद मिळत आहे. रेल्वेच्या बोगीमध्ये तयार केलेले हे रेस्टॉरंट लॉकडाऊनदरम्यान सुरू करण्यात आले होते. अशा प्रकारची रेल्वेची थीम आधारित रेस्टॉरंट येत्या काही दिवसांत कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस, नेरळ, लोणावळा आणि इगतपुरी स्थानकांवर आणि पुणे विभागातील आकुर्डी, बारामती, चिंचवड आणि मिरज स्थानकांवरही सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे.

कोरोना साथीच्या लाटेनंतर सर्व व्यवहार सर्वसामान्य होत असताना मध्य रेल्वेने रेल्वेप्रेमींसाठी थीम आधारित जुन्या बोगीचा वापर करीत चाकावरच्या हॉटेलची संकल्पना प्रत्यक्षात आणली. या हॉटेलमध्ये प्रवाशांना जेवणाचा अनोखा अनुभव मिळत आहे. येथे पी. डिमेलो मार्गावरील मागील प्रवेशद्वारावर टॅक्सी आणि कार पार्किंगसाठी भरपूर मोठी जागा असल्याने येथील निसर्गरम्य वातावरणात प्रवाशांची संध्याकाळ त्यांच्या कुटुंबीयांसोबत चांगलीच रंगतदार होत आहे.
सीएसएमटीतील रेस्टॉरंट उघडल्यापासून आतापर्यंत अंदाजे 60,000 ग्राहकांनी येथे जेवणाचा आनंद लुटला आहे. नागपूरमध्येही 3 फेब्रुवारीला रेल्वे स्थानकाच्या बाहेर रेल्वे थीम आधारित रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे.