शताब्दी रुग्णालयात सफाई कर्मचारी काढतात ईसीजी, मानवाधिकार आयोगाने महापालिकेला ठोठावला 12 लाखांचा दंड

पालिकेच्या चेंबूर येथील शताब्दी रुग्णालयात महिला सफाई कर्मचारीने एका रुग्णाचा ईसीजी काढल्याची गंभीर दखल घेत मानवाधिकार आयोगाने महापालिकेला 12 लाखांचा दंड ठोठावला आहे.

आयोगाचे अध्यक्ष ए. एम. बदर यांनी हा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाला एक महिन्यात द्यावी. एक महिन्यात ही रक्कम न दिल्यास त्यावर आठ टक्के व्याज द्यावे लागेल, असेही आयोगाने पालिकेला बजावले आहे.

मानवाधिकाराचे उल्लंघन

या रुग्णालयातील ईसीजी टेक्निशियनचे पद एक वर्षापासून रिक्त आहे. याने मानवाधिकाराचे उल्लंघन झाले आहे. शताब्दी रुग्णालयात येणाऱया शेकडो रुग्णांच्या मानवाधिकाराचे संरक्षण झालेले नाही, असे खडे बोल आयोगाने पालिकेला सुनावले.

ईसीजी टेक्निशियनची नियुक्ती करा

येथील ईसीजी विभागात प्रशिक्षित टेक्निशियनची तत्काळ नियुक्ती करा, अशी सूचना आयोगाचे अध्यक्ष बदर यांनी पालिकेला केली आहे.

वर्षाला 5016 ईसीजी

शताब्दी रुग्णालयात महिन्याला 418 तर वर्षभरात 5016 रुग्णांचे ईसीजी केले जातात. या सर्व रुग्णांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन झाले, असा ठपका आयोगाने ठेवला.

काय आहे प्रकरण…

सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी पाटील यांनी ही तक्रार आयोगाकडे केली. शताब्दी रुग्णालयात महिला सफाई कर्मचारी ईसीजी काढत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. आयोगाने याचा खुलासा मागवला. वॉर्डबॉय ईसीजी करत असल्याची माहिती आयोगाला देण्यात आली. ईसीजी प्रशिक्षित टेक्निशियनकडून काढण्यात यावा, असा अभिप्राय देण्यात आला. त्याची नोंद करून घेत आयोगाने पालिकेला चांगलाच दणका दिला.