मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या वेतनातून 1 लाख रुपये वसुल करायचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नांदेड

2 जुलै 2012 रोजी शहरातील शिवाजीनगरमध्ये असलेल्या ओम उडपी या हॉटेलमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक महिला शिपाई यांनी हॉटेल मालकाला मारहाण केल्याप्रकरणी हॉटेल मालकाला 1 लाख रुपये देण्याचे आदेश राज्य मानवी हक्क आयोगाने दिले आहेत. हे 1 लाख रुपये पोलीस उपनिरीक्षक आणि महिला पोलीस यांच्या वेतनातून वसुल करण्याचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने दिले आहेत.

2 जुलै 2012 रोजी एका रात्रीला त्याकाळी वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक सुरज चंदनशिवे आणि महिला पोलीस सिमा पठाण आणि त्यांचा भाऊ हे जेवणासाठी ओम हॉटेलमध्ये गेले होते. त्या ठिकाणी सेवा देण्यात ओम हॉटेल कडून झालेल्या चुकीबाबत सुरज चंदनशिवे आणि सिमा पठाण यांनी हॉटेलचे मालक विरेंद्र बन्सीलाल भंडारी यांना मारहाण केली. हे प्रकरण त्या ठिकाणी असलेल्या सी.सी. कॅमेऱ्यात कैद झाले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरज चंदनशिवे आणि महिला पोलीस सिमा पठाण यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

विरेंद्र बन्सीलाल भंडारी यांनी या संदर्भाची तक्रार मुंबई येथील राज्य मानवी हक्क आयोगाकडे केली. त्याचे प्रकरण क्रमांक 1835/2012-13 असे होते. या प्रकरणात राज्य मानवी हक्क आयोगाने विरेंद्र भंडारी यांना महाराष्ट्र शासनाने 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी असे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस महासंचालक कार्यालयाने विरेंद्र बन्सीलाल भंडारी यांना 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी ते पैसे नांदेड पोलीस अधिक्षकांना पाठविले होते.
पोलीस महासंचालक कार्यालयाने पाठवलेल्या या पत्रावर प्रशासन विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनुप कुमार सिंह यांची स्वाक्षरी आहे. या पत्रात दोषी अधिकारी सुरज चंदनशिवे आणि दोषी पोलीस कर्मचारी सिमा पठाण यांच्याकडून नुकसान भरपाईचे 1 लाख रुपये वसूल करावेत, असे सांगण्यात आले आहे. या आदेशात दोषी अधिकाऱ्यांकडून किती रक्कम वसूल व्हावी आणि महिला पोलिसाकडून किती रक्कम वसूल व्हावी याचे काही विवेचन करण्यात आलेले नाही.